नवी दिल्ली
सॅमसंगने आपला सर्वात महागडा स्मार्टफोन गॅलेक्सी झेड फ्लिप प्री-बुकिंगसाठी उपलब्ध करून दिला आहे. सॅमसंगचा हा दुसरा फोल्डेबल स्मार्टफोन आहे. सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिपची नोंद ऍमेझॉनवर झाली असून, 1,09,999 रुपयांमध्ये प्री-ऑर्डर केली जाऊ शकते. ऍमेझॉनच्या प्राइम सदस्यांना 2 ते 4 व्यावसायिक दिवसांत फोन मिळणे सुरू होईल, असे सांगण्यात आले आहे.
हा फोन ऍमेझॉनकडून दरमहा 5,178 रुपये ईएमआयद्वारे खरेदी करता येईल. याशिवाय जुना हँडसेट देऊन नवीन फोन खरेदी करण्यावर 7,700 रुपयांची सूट मिळू शकेल, असेही कंपनीने म्हटले आहे.
फोनची खास वैशिष्टय़े
सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप स्मार्टफोन ब्लॅक अँड पर्पल कलरमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 6.7 इंचाचा एचडीआर 10+ डायनॅमिक अमोलेड फुल एचडी + डिस्प्ले आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रगन 855+ प्रोसेसर देण्यात आला आहे. तर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. हँडसेटमध्ये एक नॅनो सिम आणि ई-सिम कार्ड वापरता येईल. या फोनमध्ये दोन 12-मेगापिक्सलचे कॅमेरे असून, सेल्फी कॅमेरा 10 मेगापिक्सलचा आहे. फोनसाठी 3300 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. गॅलेक्सी झेड फ्लिप वायरलेस आणि वायर्ड या दोन्ही प्रकारे जलद चार्जिंगला होऊ शकतो.









