जिंग, रोम / वृत्तसंस्था :
चीनच्या वुहान शहरातून फैलावलेला कोरोना विषाणू (कोविड-19) आतापर्यंत 100 हून अधिक देशांमध्ये पोहोचला आहे. तर वुहानमध्ये सातत्याने कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. पहिल्यांदाच वुहानमध्ये नव्या रुग्णांची संख्या एकेरी आकडय़ात पोहोचली आहे. बुधवारच्या दिवशी तेथे केवळ 8 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर पूर्ण चीनमध्ये 15 नवे रुग्ण मिळाले असून 11 जणांचा मृत्यू झाल्याचे चीनच्या आरोग्य विभागाने गुरुवारी संगितले आहे. कोरोना विषाणूवर बऱयापैकी नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे चीनकडून जाहीर करण्यात आले आहे.
चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 80793 रुग्ण सापडले असून 3172 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात 4632 जणांना जीव गमवावा लागला असून 126200 रुग्ण आहेत. हुबेई प्रांत आणि वुहानमध्ये सुमारे 5 कोटी लोक अद्याप लॉकडाउन आहेत.
दक्षिण कोरिया
कोरिया सेंटर्स फॉर डिजिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार 24 तासांत 114 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 7869 रुग्ण सापडले असून 66 जणांनी जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 333 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. दक्षिण कोरियाने देशात 4 स्तरीय विषाणू ‘रेड लेव्हल’चा इशारा दिला आहे. तेथील डेगू शहरात 5867 रुग्ण सापडले आहेत.
इटली
युरोपमध्ये इटलीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला असून तेथे 12462 नागरिकांना लागण झाली आहे. तर 827 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीचे पंतप्रधान गिउसेप कोंटे यांनी देशातील सर्व दुकाने, कॉफी बार, पब, रेस्टॉरंट आणि ब्यूटी सलुन्स बंद करण्याची घोषणा केली आहे. तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱयांना सुटी घेणे किंवा घरातून काम करण्याचे आवाहन केले आहे.
फ्रान्स
युरोपमध्ये इटलीनंतर फ्रान्समध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. फ्रान्सचे सांस्कृतिक मंत्री प्रँक रिस्टर आणि 5 खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. फ्रान्समध्ये कोरोनामुळे जीव गमाविणाऱयांची संख्या 48 झाली आहे. तर एकूण रुग्णांची संख्या 2281 वर पोहोचली आहे. फ्रान्सच्या वाणिज्य दूतावासाने स्वतःच्या नागरिकांना भारताचा दौरा टाळण्याचा सल्ला दिला आहे.
अमेरिका
अमेरिकेच्या 43 प्रांतांमध्ये आतापर्यंत 1258 रुग्ण सापडले आहेत. तर 38 जणांनी जीव गमावला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपवर पुढील 30 दिवसांसाठी प्रवासबंदी लादली आहे. या निर्णयामुळे युरोपच्या देशांमधून कुठलाच प्रवासी एक महिन्यापर्यंत अमेरिकेत दाखल होऊ शकणार नाही. पण या निर्बंधातून ब्रिटनला सूट देण्यात आली आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क ऍस्पर यांनी 15-20 मार्च या कालावधीत होणारा भारताचा दौरा रद्द केला आहे.