मिऱया-नागपूर राष्ट्रीय महामार्ग रूंदीकरण,
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मिऱया-नागपूर महामार्ग चौपदरीकरणाची अधिसुचना जारी झाली असून त्यात कुवारबाव बाजारपेठेचाही समावेश आहे. या बाजारपेठेतून 45 मीटरच्या निकषाप्रमाणेच रुंदीकरणासाठी भूसंपादन केले जाणार आहे. बाधीतांना रेडिरेकनर प्रमाणे चौपट दर मिळणार असल्याची माहिती †िवशेष भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांनी दिली.
मिऱया-नागपूर महामार्गासाठी जादा जागा देण्यास कुवारबावमधील व्यापाऱयांनी तीव्र विरोध केला होता. त्यांनी बाजारपठेत 45 मीटर ऐवजी 30 मीटर भूसंपादन करण्याची मागणी केली होती. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. मात्र, बाजारपेठेतही 45 मीटर प्रमाणेच भूसंपादन केले जाणार असल्याचे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे. या महामार्गासाठी थ्री ए अधिसूचना प्रक्रिया पूर्ण झाली असून आता थ्री डी प्रक्रिया प्रस्तावित आहे. त्यासाठी 21 दिवसात हरकती मागविण्यात आल्या आहेत. महामार्गामध्ये रत्नागिरी तालुक्यातील 15 तर संगमेश्वर तालुक्यातील 13 गावांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.
या राष्ट्रीय महामार्गावरील मिऱया ते आंबाघाटपर्यंतच्या जमीन संपादनाचे काम प्रांताधिकारी कार्यालयातून सुरु आहे. सुमारे 68 किमीच्या रस्त्याचे रूंदीकरण हाती घेण्यात आले आहे. सध्याच्या रस्त्याच्या मध्यबिंदूपासून दोन्ही बाजूंनी साडे बावीस-साडेबावीस फुट म्हणजे एकूण 45 मीटर प्रमाणे भूसंपादन प्रस्तावित आहे. या टप्प्यात रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यांचा समावेश आहे. एकूण 137.41 हेक्टर (आर) जमीन त्यासाठी संपादित केली जाणार आहे. पैकी 115.21 हेक्टर जमिनीच्या थ्रीडीचे (जमीन अधिग्रहण करण्याचे निश्चित) काम पूर्ण झाले आहे. लवकरच त्याची अधिसूचना निघणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संगमेश्वर तालुक्यातील बहुतेक गावांचे निवाडेही घोषित करण्यात आले.
थ्रीडी झालेल्या जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यानंतर मोबदला वाटप होईल. मिऱया-नागपूर मार्गातील कुवारबाव बाजारपेठेतील व्यापाऱयांनी याला विरोध केला. 45 मीटरप्रमाणे भूसंपादन झाल्यास कुवारबावची बाजारपेठ उद्ध्वस्त होईल अशी भीती व्यापाऱयांनी व्यक्त केली. 30 मीटर प्रमाणे भूसंपादन व्हावे, अशी व्यापाऱयांची मागणी होती. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनाही निवेदन देऊन झाले. मात्र शासनाने 45 मीटर प्रमाणे फेर भूसंपादनाचा निर्णय घेतला आहे. त्याचेही थ्रीडीचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच या कामाची अधिसूचना जारी झाली आहे. 21 दिवसात त्यासाठी हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर रेडिरेकनर प्रमाणे खातेदारांना चौपट दर मिळणार आहे, अशी माहिती डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.