सॉफ्टवेअर अभियंत्यांच्या कुटुंबालाही लागण : राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या चारवर
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात जीवघेण्या कोरोना व्हायरसबाधीत रुग्णांची संख्या चारवर पोहोचली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कहून परतलेल्या सॉफ्टवेअर अभियंत्याला कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले होते. या पाठोपाठ त्याची पत्नी, मुलगा आणि कारचालकालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बेंगळूरसह राज्यात भीती पसरली आहे. कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत भर पडत असल्याने राज्य सरकारने खबरदारी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
राज्यात 24 तासांत चौघांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांनी ट्विटरवर सांगितले आहे. अमेरिकेहून 1 मार्च रोजी बेंगळूरला परतलेल्या सॉफ्टवेअर अभियंत्यापाठोपाठ त्याच्या कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर राजीव गांधी इस्पितळात स्वतंत्र कक्षात उपचार केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी अधिकाऱयांची तातडीची बैठक बोलावून माहिती घेतली. तसेच महत्त्वाच्या सूचना केल्या. दरम्यान आरोग्यमंत्री श्रीरामुलू यांनी मंगळवारी बेंगळूरच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आरोग्य तपासणी व्यवस्थेची पाहणी केली.
कार्यालय बंद
दोम्मलूर रिंगरोडवर एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱया सॉफ्टवेअर अभियंत्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे या कंपनीचे कार्यालय बंद करण्यात आले आहे. येथील कर्मऱयांना घरी राहूनच काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कंपनीच्या व्यवस्थापनाने आपल्या कर्मचाऱयांना यासंबंधीचा ई-मेल पाठविला आहे.
जनऔषधी केंद्रांमार्फत मास्क वितरण
राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने त्याचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जनऔषधी केंद्रांमार्फत मास्क वितरीत करण्यात येतील. जनतेने विनाकारण भयभीत होण्याचे कारण नाही. अलिकडेच विमानतळांवर मास्क वितरीत करण्यात येत आहेत. सरकारी इस्पितळे आणि जनऔषधी केंद्रांमार्फत मास्क आणि सॅनिटायझर वितरीत करण्यात येत आहेत, अशी माहिती मंत्री श्रीरामुलू यांनी दिली.
वैद्यकीय कर्मचाऱयांना अतिरिक्त विमा
कोरोना व्हायरसबाधीत रुग्णांवर उपचार करणाऱया वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचाऱयांना अतिरिक्त आरोग्य विमा सुविधा देण्याबाबत राज्य सरकार विचाराधीन आहे, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले आहे. वैद्यकीय कर्मचाऱयांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. कोरोनाबाधीत रुग्णांवर अपचार करताना आरोग्य खात्याने तयार केलेल्या मार्गसूचींचे पालन करावे, अशी सूचना डॉ. सुधाकर यांनी दिली आहे.
बेंगळुरात मांसविक्री बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी बेंगळूर शहरातील मांसविक्री पूर्णपणे बंद करण्याची सूचना दिली आहे. कोणत्याही कारणास्तव मांसविक्री करू नये. त्यामुळे चिकन, मटण दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. कोंबडी, बकरी, मेंढी यांची कत्तल करून त्यांचे रक्त इतरत्र फेकून दिले जाते. त्यावर माश्या व डास बसून रोगराई पसरण्यास सुरूवात होते. मांसविक्री बंद झाल्यास निम्मी समस्या दूर होईल. त्यामुळे बुधवारपासून शहरातील मांसविक्री दुकाने बंद करा, अशी सूचना येडियुराप्पा यांनी बेंगळूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिली आहे.
सॉफ्टवेअर अभियंता 2666 जणांच्या संपर्कात
संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसचा राज्यातील पहिला रुग्ण सोमवारी बेंगळूरमध्ये आढळला होता. 1 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता न्यूयॉर्कहून बेंगळूरमध्ये आलेल्या सॉफ्टवेअर अभियंता 4 मार्च रोजी वैद्यकीय तपासणीसाठी इस्पितळात दाखल झाला होता. त्यानंतर सोमवार दि. 9 मार्च रोजी तो कोरोनचा पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. या कालावधीत तो एकूण 2666 जणांच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झाले आहे. एमिरेट्स कंपनीच्या विमानातून प्रवास केलेल्या प्रवाशांसह तो कंपनीत काम करीत असलेले कर्मचारी, घराशेजारील नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.