ऑनलाईन टीम / भोपाळ :
काँग्रसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा पाठविला आहे. मागील काही दिवसांपासून ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसवर नाराज होते. मागील लोकसभा लोकसभा निवडणुकीत दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना आपापल्या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर राज्यसभेवर निवड न झाल्यामुळे त्यांची नाराजी अधिक गडद झाली. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश करण्याचे निश्चित केले.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकविल्याने मध्यप्रदेशातील राजकीय हलचालींना वेग आला होता. शिंदे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज भेट घेतली. त्यानंतर थोडय़ाच वेळात त्यांनी आपला राजीनामा दिला. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत काँग्रेसचे 19 आमदार आहेत. ते सध्या बंगळूरच्या पाम रिसॉर्टमध्ये वास्तव्यास आहेत.
जोतिरादित्य शिंदेंना भाजप राज्यसभेवर पाठविणार असून, नंतर त्यांना केंद्रात मंत्रिपद देणार असल्याचे समजते. जोतिरादित्य शिंदे भाजपात प्रवेश करणार असल्याचे आता निश्चित झाले असले तरी देखील त्यांच्यासोबतचे 19 आमदार भाजपात जाणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मध्यप्रदेशातील राजकीय वातावरण तापल्याने मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सोमवारी रात्री उशीरा कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक बोलावून सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत. दरम्यान, राजकीय वातावरण तापल्याने भाजपनेही मध्यप्रदेशातील आमदारांची आज (मंगळवार) संध्याकाळी 6 वाजता बैठक बोलावली आहे. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही आज भाजपाच्या संसदीय बोर्डाची बैठक बोलावली आहे.