कार्यकर्त्यांसह नेतेही प्रचारात व्यस्त, सर्वांकडून घरोघरी प्रचारावरच भर
प्रतिनिधी/ पणजी
जिल्हा पंचायत निवडणूक प्रचारात राज्यातील राष्ट्रीय आणि स्थानिक पक्षांचे कार्यकर्ते पूर्णपणे सक्रीय झाले आहेत. या अगोदर विधानसभा निवडणुकीवेळी सर्व राजकीय पक्ष प्रचार कार्यात सक्रीय असायचे. पण जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी प्रथमच अशी स्थिती आहे. काँग्रेस पक्ष पहिल्यांदाच जि. पं. निवडणूक पक्षीय पातळीवर लढवित आहे. त्यामुळे भाजपसाठी पहिल्यांदाच जि. पं. निवडणुकीत आव्हान तयार झाले आहे.
काँग्रेस, भाजप या प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह मगो, आप व राष्ट्रवादी कॉंग्रेसही पक्षीय पातळीवर निवडणूक लढवित आहे. मात्र खरी लढत ही भाजप व काँग्रेस पक्षातच आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. या दोन्ही पक्षांकडे कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ आहे. दोन्ही पक्षांनी निवडणुकीसाठी स्वतंत्र रणनिती ठरविली आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे काँग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष प्रबळ दावेदार ठरले आहेत.
राजकीय ताकद वाढविण्याचे प्रयत्न
काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी जि. पं. निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. भाजपने 50 पैकी 42 मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत तर काँग्रेसने 38 उमेदवार उभे केले आहेत तर 2 अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. या सर्व उमेदवारांच्या प्रचारावर या दोन्ही पक्षांनी भर दिला आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते प्रचारात सक्रीय आहेत. प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या बरोबरीने जि.पं. निवडणुकीचा प्रचार चालला आहे.
भाजपची प्रतिष्ठा पणाला
राज्यात सध्या भाजपचे सरकार सत्तेवर आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच भाजप सार्वत्रिक निवडणूक लढवित आहे. या अगोदर मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखाली पोटनिवडणूक पक्षाने लढविली आहे. मागील जि. पं. निवडणूक व विधानसभा निवडणूक यामध्ये भाजपला म्हणावे तसे यश मिळाले नाही. मागील जि. पं. निवडणुकीत भाजपला सत्तेवर असूनही 50 पैकी केवळ 19 जागा मिळाल्या तर 2017 च्या विधानसभा निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असतानाही केवळ 13 जागा मिळाल्या होत्या.
भाजपकडे 27 आमदारांचे संख्याबळ
आज भाजपकडे 27 आमदारांचे संख्याबळ आहे. या पैकी 12 आमदार हे काँग्रेस पक्षातून भाजपात गेले आहेत. आता या सर्व आमदारांसह अपक्ष आमदारांच्या सहकार्याने जि. पं. निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची तयारी भाजपने चालविली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा खऱया अर्थाने पणाला लागली आहे. भाजपचे सर्व मंत्री, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते सध्या प्रचारात सक्रीय बनले आहेत.
घरोघरी प्रचारावर भर
राज्यात पहिल्यांदाच जि. पं. निवडणुकीत राजकीय रणांगण पेटले आहे. विधानसभा निवडणुकीच्या बरोबरीने सध्या जि. पं. निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यकर्ते प्रचारात व्यस्त असतात. सध्या घरोघरी प्रचारावर कार्यकर्त्यांनी भर दिला आहे.
काँग्रेसने लावली ताकद
जि. पं. निवडणूक यावेळी काँग्रेसनेही गांभीर्याने घेतली आहे. काँग्रेसकडे केवळ पाच आमदारांचे संख्याबळ आहे. पण तरीही जि. पं. निवडणुकीत समाधानकारक यश मिळविण्यासाठी काँग्रेसने जोरदार प्रयत्न चालविले आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत विरोधात असूनही काँग्रेसने आपले आमदारांचे संख्याबळ 9 वरून 17 वर पोचविले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यावेळीही जि. पं. निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत
बहुतेक ठिकाणी बहुरंगी लढती
जिल्हा पंचायत निवडणुकीत बहुतेक मतदारसंघातून बहुरंगी लढती होणार असून काँगेस, भाजप, मगो आणि आप या चार राजकीय पक्षांचा व त्यांच्या उमेदवारांचा कस लागणार आहे. उत्तर गोव्यातील ताळगाव, नगरगाव, केरी या तीन तर दक्षिण गोव्यातील पैंगीण, उसगाव गांजे या दोन अशा मिळून पाच मतदारसंघात दुरंगी अर्थात थेट लढत होणार असून इतर सर्व मतदारसंघातून तिरंगी ते बहुरंगी लढती अपेक्षित आहेत.
प्रत्येक मतदारसंघातील जिल्हा पंचायत निवडणुकीतील उमेदवारांचे निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यामुळे आता राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार प्रचाराच्या मागे लागले आहेत. उत्तर गोव्यातील एकूण 8 मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहेत, तर एकूण 4 मतदारसंघातून चौरंगी लढतीचा सामना होणार आहे. 3 मतदारसंघात पंचरंगी लढती आहेत. 6 मतदारसंघातून प्रत्येकी 6 व त्यापेक्षा जास्त उमेदवारांची एकमेकांशी लढती आहेत.
दक्षिण गोव्यातील 9 मतदारसंघातून तिरंगी लढती आहेत, तर पाच मतदारसंघातून चौरंगी लढती होणार आहेत. 2 मतदारसंघातून पंचरंगी तर 5 मतदारसंघातून प्रत्येकी 6 किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार एकमेकांशी लढणार आहेत. बहुतेक मतदारसंघात अपक्ष उमेदवारांचा भरणा असून त्यांनी मते फोडली तर भाजप, काँग्रेस व मगोच्या उमेदवारांना त्याचा फटका बसू शकतो, असे चित्र आहे.
49 जागांसाठी प्रत्यक्ष मतदान
एकूण 50 जागांपैकी एका जागेवर (सांकवाळ) भाजपचा उमेदवार अनिता थोरात या बिनविरोध निवडून आल्यामुळे आता 50 ऐवजी 49 जागांवरच (उत्तर गोवा 25 व दक्षिण गोवा 24) निवडणूक व प्रत्यक्ष मतदान होणार आहे. गोवा फॉरवर्ड या राजकीय पक्षाने सदर निवडणुकीतून अलिप्त राहण्याचे ठरविले असून त्यांचा अधिकृतपणे एकही उमेदवार रिंगणात नाही. त्यामुळे गोवा फॉरवर्डचा कस लागण्याचा प्रश्नच नाही.









