फॉरवर्ड स्थानावरून आक्रमक खेळ करणारी राणी रामपाल जगातील सर्वोत्तम महिला हॉकीपटूंपैकी एक आहे. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आगामी टोकिओ ऑलिंपिकमध्ये भाग घेणार आहे.
पूर्वी भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? असं विचारल्यास ‘हॉकी’ असे निर्विवाद उत्तर यायचे आणि ते खरे होते. ध्यानचंदना ‘हॉकीचे जादूगार’ म्हणून ओळखतात. एकेकाळी हॉकी विश्वावर भारतीय पुरुष संघाची मक्तेदारी होती. आठ ऑलिंपिक पदके मिळवणाऱया भारतीय हॉकी संघाची मक्तेदारी 1980 नंतर समाप्त झाली. आतातर भारतीय हॉकी हा खेळ नावापुरताच शिल्लक आहे. म्हणून 2012 साली भारतीय युवा आणि क्रीडा संस्कृती मंत्रालयाने आता भारताचा राष्ट्रीय खेळ कोणताही नाही असे जाहीर केले आहे. मग भारतीय महिला हॉकी संघाची अवस्था काय असणार? अशा परिस्थितीत ‘हॉकी क्वीन’ राणी रामपाल अलीकडेच ‘वर्ल्ड गेम्स ऍथलेट ऑफ द इयर 2019’ हा प्रतिष्ठेचा किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला हॉकीपटू ठरली. त्यानंतर तिला परवा पद्मश्री पुरस्कारही मिळाला.
आता आपण राणी रामपालची हॉकी कारकीर्द पाहू. 25 वर्षीय राणी रामपालचा जन्म हरियाणातील कुरूक्षेत्र जिल्हय़ातील शाहबाद मारकांडा येथे एका गरीब कुटुंबात झाला. तिचे वडील मोलमजुरी करीत असत. तिच्या गावात हॉकी खेळली जात असे. वयाच्या सहाव्या वर्षी ती गावच्या संघातून खेळू लागली. शहाबाद हॉकी अकादमीचे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक बलदेव सिंग यांनी राणीमधील गुणवत्ता हेरली. पण कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे तिच्या कुटुंबियांना तिच्या भवितव्याची चिंता वाटू लागली. त्याचवेळी गोस्पोर्ट्स फौंडेशनने तिला आर्थिक आणि इतर मदत देऊ केली. आणि तिथून तिच्या जीवनाला वेगळे वळण लागले.
राणीने हॉकीतील आपल्या अप्रतिम कौशल्याने वयाच्या 14 व्या वर्षी राष्ट्रीय महिला हॉकी संघात स्थान मिळवले. 2009 मध्ये रशियात झालेल्या चँम्पियन्स हॉकी स्पर्धेच्या अंतिम लढतीत राणीने 4 गोल करून भारताला अजिंक्यपद मिळवून दिले होते. ती या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली होती. याच वर्षी भारतीय संघाने एशिया कप स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. 2010 मध्ये अर्जेंटिनात झालेल्या वर्ल्ड कप हॉकी स्पर्धेत राणीने एकूण 7 गोल केले. या स्पर्धेत भारताने नववा क्रमांक मिळवला. या स्पर्धेतील 1978 नंतरची भारताची सर्वोत्तम कामगिरी होती. 2017 मध्ये जपानमध्ये झालेल्या एशिया कप स्पर्धेत अजिंक्यपद मिळवलेल्या भारतीय संघाची राणी कर्णधार होती. तत्पूर्वी आदल्या वर्षी तिला अर्जुन पुरस्कार मिळाला होता. 2018 मध्ये तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला एशियन गेम्समध्ये रौप्यपदक मिळाले होते.
36 वर्षांनंतर रिओ ऑलिंपिकमध्ये भारतीय महिला संघ खेळला. या संघात राणीचा समावेश होता. फॉरवर्ड स्थानावरून आक्रमक खेळ करणारी राणी रामपाल 2016 पासून भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार आहे. जगातील सर्वोत्तम महिला हॉकीपटूंपैकी एक म्हणून ती ओळखली जाते. 212 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या राणीने 134 गोल केले आहेत. राणी रेल्वेमध्ये ज्युनियर क्लार्क या पोस्टवर नोकरी करते आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये ती सहाय्यक प्रशिक्षक आहे. इंग्रजी विषय घेऊन ती एमए करीत आहे.
पात्रता टप्प्यातील महत्त्वाच्या सामन्यात कर्णधार राणी रामपालने अमेरिकेविरूध्द केलेल्या विजयी गोलमुळे भारतीय हॉकी संघ यंदाच्या टोकिओ ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरला. आतापर्यंत केवळ तिसऱयांदा हा संघ ऑलिंपिकमध्ये भाग घेत आहे. ‘आऊटलूक’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणते, टोकिओ ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेले सर्व संघ समान ताकदीचे आहेत. त्यात कुणीही एखादा प्रबळ दावेदार नाही. त्यामुळे सर्व संघांना अजिंक्यपदाची समान संधी आहे. त्यामुळे माझ्या संघाला पदक मिळण्याची आशा आहे.’ भारतीय महिला हॉकी संघाला ओडिशा शासनाने पुरस्कृत केले आहे. सध्या जागतिक क्रमवारीत भारतीय महिला संघाचा नववा क्रमांक लागतो.
भारतीय महिला संघाला वर्ल्ड कप आणि ऑलिंपिकमध्ये एकही पदक मिळालेले नाही. मात्र एशियन गेम्समध्ये (1 सुवर्ण, 2 रौप्य, 3 कांस्य), एशिया कपमध्ये (2 सुवर्ण, 2 रौप्य, 2 कांस्य), राष्ट्रकुल स्पर्धा (1 सुवर्ण, 1 रौप्य), एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी (1 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कांस्य), अफ्रो-एशियन गेम्स (1 सुवर्ण), हॉकी चॅम्पियन्स चॅलेंज (1 सुवर्ण) अशी भारतीय महिला हॉकी संघाची आतापर्यंतची कामगिरी आहे. आगामी टोकिओ ऑलिंपिकसाठी राणी रामपालच्या भारतीय हॉकी संघाला शुभेच्छा देऊया!