प्रतिनिधी / ओरोस:
लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी प्रज्योत प्रदीप नाईक (25, रा. सरंबळ देऊळवाडी) याला सिंधुदुर्गनगरी येथील विशेष न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी दोषी ठरवत दहा वर्षे सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
एक शाळकरी अल्पवयीन मुलगी दुकानात काम करायची. दुकानात येणाऱया प्रज्योत याच्याशी तिची मैत्री झाली. वयाने लहान असलेल्या या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून प्रज्योत याने तिला प्रेमाच्या जाळय़ात अडकवले. एप्रिल 2016 ते जानेवारी 2019 या कालावधीत त्याने कुडाळ एमआयडीसी, वेंगुर्ले सागरेश्वर बीच, त्यानंतर आपल्या राहत्या घरी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. दरम्यान ती गरोदर असल्याचे लक्षात येताच अद्याप 18 वर्षे पूर्ण झाली नसल्याचे कारण देत सावंतवाडी येथील एका मान्यताप्राप्त केंदात नेऊन तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले होते. यावेळी त्याने तिचे खरे नाव न सांगता बनावट नाव सांगितले होते. डिसेंबर 2016 मध्ये तिचा जबरदस्तीने गर्भपातही करण्यात आला होता.
ही गोष्ट पीडित मुलीच्या घरच्यांना समजल्यानंतर त्यांनी 4 जुलै 2017 रोजी प्रज्योतविरोधात तक्रार दिली होती. प्रज्योत याने 14 मार्च 2018 रोजी दुसऱया मुलीशी लग्न केले होते. याबाबतचा जाब पीडित मुलीने विचारला असता घरच्या लोकांनी हिस्सा देणार नाही, असे सांगितल्याने जबरदस्तीने हे लग्न आपल्याला करावे लागले, असे कारण तिला देत बाजू मारून नेली होती. तसेच आपण लवकरच तिच्याशी घटस्फोट घेणार आहोत. तो झाल्यावर तुझ्याशी लग्न करणार असल्याचे प्रज्योत याने पीडित मुलीला सांगितले होते.
त्यानंतर आपल्याकडे असलेले अश्लील फोटो सगळय़ांना दाखवून बदनामी करणार असल्याची धमकी देत जानेवारी 2019 पर्यंत त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. दरम्यान त्याने तिला लग्नाला नकार दिला होता. त्यामुळे पीडित मुलीने त्याच्या विरोधात 27 मार्च 2019 रोजी कुडाळ पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार प्रज्योत याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला 28 मार्च रोजी अटक केली होती. 1 एप्रिलपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली होती. 7 जून 2019 पर्यंत तो न्यायालयीन कोठडीत होता. त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता.
दरम्यान विशेष न्यायालयात चाललेल्या या खटल्याच्या सुनावणीत एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगी आणि गर्भपात करणाऱया डॉ. भक्ती सावंत यांची साक्ष महत्वाची ठरली. तपासिक अंमलदार म्हणून कुडाळ पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक गायत्री पाटील यांनी काम पाहिले. कोर्ट कामकाजात पैरवी उप निरीक्षक मुल्ला, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास राणे, हेड कॉन्स्टेबल मल्लिकार्जुन ऐहोळे, विष्णू नाईक यांनी सहकार्य केले.
न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्यानुसार प्रज्योत याला दोषी धरून न्यायालयाने भा. दं. वि. कलम 376 (1), 376 (2), बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3, 4, 5 (जे) (2) (1), 6 नुसार दहा वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच भा. दं. वि. कलम 417 नुसार सहा महिने सश्रम कारावास आणि भा. दं. वि. 506 नुसार एक वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. दंडाची रवकम पीडित मुलीला देण्याचे न्यायालयाने आदेश दिले. तर सर्व शिक्षा एकत्रित भोगण्याची मुभा दिली. 28 मार्च ते 7 जून 2019 या कालावधीची शिक्षा वजा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच भा. दं. वि. 376 (3) व 312 नुसार त्याला निर्दोष करण्यात आले.
सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांकडून समाधान व्यक्त
गुन्हा दाखल झाला तेव्हा पीडित मुलगी ही सज्ञान झाली असली, तरीही ती अल्पवयीन असतानाच तिच्यावर अत्याचार झाले असल्याची बाब न्यायालयासमोर आणून देण्यात आली. साक्षीदारांनी नोंदवलेली साक्ष ही समाधानकारक असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत आरोपीला दोषी धरून जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी सरकार पक्षाकडून करण्यात आली होती. दरम्यान न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत सहाय्यक सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी समाधान व्यक्त केले.