मालवण / प्रतिनिधी
वेंगुर्ले समोरील समुद्रात वीस वावात अवैधरीत्या एलईडी पर्ससीननेटद्वारे मासेमारी करणारा गोव्यातील ट्रॉलर मत्स्य व्यवसायच्या गस्तीनौकेने मध्यरात्री तीन वाजता पकडला. मात्र ट्रॉलरमध्ये बिघाड झाल्याचे कारण पुढे करून हा ट्रॉलर पळून गेला. मत्स्य व्यवसायच्या पथकाने ट्रॉलरसोबत असलेली छोटी होडी, एलईडीचे बल्ब, जनरेटर, आवश्यक कागदपत्रे तसेच अन्य साहित्य जप्त करण्याची कार्यवाही केली. या ट्रॉलरवरील खलाशी, तांडेल यांच्याकडून जबाब घेण्यात आला आहे. या एलईडी ट्रॉलरवर कारवाईसाठी तहसीलदारांकडे प्रतिनिवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसायचे परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी सांगितले.
दरम्यान गोव्यातील ट्रॉलर पकडल्यानंतर तो येथील बंदरात आणण्यात येत होता. मात्र वाटेत ट्रॉलरमध्ये बिघाड झाल्याचे कारण पुढे करून संबंधित ट्रॉलर व्यावसायिकाने शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मच्छीमार नेते बाबी जोगी यांनी यावेळी केली.