मृतांचा आकडा 13 वर
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात दोन दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत एका पोलिसासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 67 पोलिसांसह 150 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव जाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच दंगेखोरांना दिसताक्षणी गोळय़ा घालण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱयावर असतानाच हा हिंसाचार घडल्याने यामागे कट असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तणावग्रस्त भागात ड्रोनद्वारे टेहाळणी करण्यात येत आहे. तसेच हिंसाचारग्रस्त भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. हिंसेच्या घटनेनंतर भजनपुरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आलीय. तर खजुरीखासमध्ये रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे.
दिल्लीतील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने आयपीएस अधिकारी एस. एन. श्रीवास्तव यांना दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून तत्काळ नियुक्त केले आहे. तसेच ही परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीनंतर राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेत दिल्लीकरांना शांततेचे आवाहन केले.