आतापर्यंत आपण मनोरंजक आणि बुद्धीला चालना देणाऱया श्लोकांचा प्रहेलिकांतर्गत आस्वाद घेतला. हा प्रकार वाचकांना आवडल्याचे लक्षात आले. पण इथेच श्लोकांचे भांडार संपत नाही. संस्कृतमध्ये सुभाषिते हा प्रकारही अत्यंत समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. विद्याप्रशंसा, सज्जन प्रशंसा, गुणप्रशंसा असे कित्येक विषय सुभाषितांमध्ये हाताळलेले दिसतात. आजही असेच काही श्लोक पाहूया.
प्रथम ईशस्तुती.
शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे।
सर्वदा सर्वदा ।़स्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्।
या श्लोकाचे वैशिष्टय़ म्हणजे यात शारदा, वदना, सर्वदा, सन्निधिं हे शब्द दोन दोन वेळा आले आहेत. यात शारदा म्हणजे सरस्वती. परंतु शरद ऋतूचाही संबंध आहे. कारण ह्या ऋतूत कमळांचाही मोसम असतो. म्हणून ही शरत्-कमलवदना म्हटले आहे. अम्भस, अंबू म्हणजे पाणी, वदन म्हणजे मुख, सन्निधिं म्हणजे निधी, साठा, ठेव. ही ठेव म्हणजे विद्या. म्हणजे याचा अर्थ असा-शरद ऋतुतील कमळाप्रमाणे जिचे मुख आहे अशा हे सर्व काही देणाऱया हे शारदे, आमच्या मुखात तो (सत् निधिं) मंगलमय असा विद्येचा निधी नेहमी उपलब्ध करून दे! आता हा दुसरा श्लोक पाहूया. ह्या श्लोकात गणपतीला खायला आवडणाऱया कोणत्या वस्तू आहेत, त्यांचा उल्लेख आहे. आपल्याला फक्त ‘मोदक’ हाच प्रिय असल्याचे माहीत आहे.
गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम्।
उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्व्ा्रर पादपङ्कजम्।।
अर्थ-ज्याचे मुख हत्तीसारखे आहे, भूतगण इ. ज्याची नेहमी सेवा (भक्ती) करतात, बेलफळ आणि जांभूळ हे ज्याचे आवडते खाद्य आहे, जो पार्वतीचा पुत्र आहे, तसेच जो प्राणिमात्रांच्या दु:खाचा (शोक) नाश करणारा आहे, त्या विघ्नेश्वराच्या चरणकमलांना मी नमस्कार करतो! आपल्याला वक्रतुंड महाकायं….’ हा गणपतीचा श्लोक सुपरिचित आहे. पण वरील श्लोक तेवढा परिचित नाही. गणपतीला कोणती फळे आवडतात तेही कदाचित माहीत नसेल. पण बेलफळ, जांभूळ ही आरोग्यदृष्टय़ा अतिशय उपयुक्त फळे ही त्याची आवडती फळे आहेत, हे यावरून कळते. ‘मोदक’ हा मानवनिर्मित पदार्थ आहे आणि माणसानेच त्याला मोदक आवडतात अशी कल्पना केली आहे. पण हत्तीसारखा अवाढव्य प्राणी मोठाल्या वृक्षांची त्याला आवडणारी मधुर फळे सोंडेने सहज काढून खाऊ शकतो. ते जास्त नैसर्गिकही वाटते! आजपासून थोडे व्यावहारिक संस्कृतही आपण शिकूया!