रुक्मिणीच्या रूपाचे वर्णन काय करावे? ती मुळात निर्गुण निराकार अरूप असलेली आदिशक्ती रुक्मिणीच्या रूपात सगुण साकार होऊन अवतरली होती. तिच्या आगमनाबरोबर तो मंडप तिच्या तेजाने उजळून निघाला. तिला पाहताच कुणाचीही दृष्टी तिच्यावर खिळून राहत असे. दुसरे काहीही दृष्टीने पहावे असे वाटेना. नाना रूपात ती भिमकीच प्रकाशमान झाली आहे असे भासत होते. दुसरे कोणतेही रूप दिसत नव्हते. जीव स्वतःला विसरले. डोळय़ांना तिचे वेड लागले. हिने त्या आदिपुरुषाला, कृष्णाला वेड लावले तिथे इतरांची काय कथा? कृष्ण बुद्धिमान, शहाणा म्हणून प्रसिद्ध. त्यालाही हिने वेड लावून आपल्याकडे ओढून नेले. हिची तुलना दुसऱया कुणाशी करणार? रुक्मिणी ही लावण्याची रासच जणू. पण ती कृष्णाच्या लावण्याला भुलली आणि आपली जात, कुळ विसरून त्याच्या रूपाच्या ठायी एकरूप झाली. भीमकी वधू म्हणून कृष्णाला योग्य आहे आणि कृष्ण वर म्हणून भीमकीला योग्य आहे. अशी जोडी शोधूनही सापडणार नाही. सगळेजण एकटक रुक्मिणीच्या अलौकिक सौंदर्याकडे पाहत होते आणि कृष्णाच्या निवडीची तारिफ करीत होते. ती गोरी होती, अतिशय सुंदर होती. तिचे डोळे विशाल होते आणि भाल प्रदेश विस्तीर्ण होता. ती सर्वांग सुकुमार होती. कृष्ण पाहण्यासाठी तिने डोळय़ात अंजन घातले होते. तिचे मुख पाहताच मनातील सर्व विकल्प नाहीसे होत होते.
भुंवया सुरेख सरळ नासिक । गंडस्थळीं तेज अधिक ।
नाकींचें मोति जडितमाणिक ।तेणें श्रीमुख शोभतसे।
सरळ बाहू सुपोष । कोंपर मनगटें कळास ।
पांचां आंगोळियां विन्यास । कळन्यास मुद्रिका ।
सुरंग तळवे आणि तळहात । अधरबिंब अति आरक्त।
बोलीं मधुरता तळपत । तेणें झळकत दंतपंक्ती ।
कटिप्रदेशें शोभत जघन । माज अतिशयेंसीं सान ।
घोंटी कळाविया सुलक्षण । बरवेपण पाउलां ।
माथां मोतिलग जाळी । इळके फरातळीं हांसळी ।
मिरवे भांग टिळा कपाळीं । तेज झळाळी तानवडां ।
नेसली क्षीरोदक पाटोळा । त्यावरी रत्नांची मेखळा ।
सुनीळ कांचोळी वेल्हाळा । लेइली माळा मोतिलग ।
गंगातीरिं चक्रवाकें । तेवीं कुचद्वय सुरेखें ।
हृदयीं घननीळ झळके । शोभां पदकें दाविजे ।
नाकींचें झळकत सुपाणी । तेणें शोभली रुक्मिणी ।
शोभा आली बाहुभूषणीं । रत्नकंकणी कळाविया ।
चरणीं गर्जती नुपुरा । भुलोनि मदन आला उदरा ।
तेही भुलली शार्ङ्गधरा । कृष्णवर वरावया ।
नाहीं लग्नास व्यवधान । वेगीं करा फळार्पण ।
उठोनि वसुदेव आपण । करी पूजन भिमकीचें ।
रुक्मिणीच्या भुवया रेखिव होत्या. नाक सरळ होते. भालप्रदेशाचे तेज सर्वत्र पसरले होते. नाकातील नथ माणिक मोत्यांनी सजली होती. त्यामुळे तिचे श्रीमुख आणखीनच सुंदर दिसत होते. तिचे ताकदवान बाहू सरळ होते. हाताच्या बोटांमध्ये सुंदर आंगठय़ा घातल्या होत्या. तिचे ओठ लाल होते. ती मधुर बोलत होती. त्यावेळी तिचे दांत चमकत होते.
ऍड. देवदत्त परुळेकर







