स्टायलिश बाईक’ खरेदी करण्याकडे तरुणांचा ओढा अधिक असल्याचे दिसून येत आहे. विविध कंपन्यांच्या ’स्टायलिश’ बाईकची बुकिंग आणि विक्री झाल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. आज तरुणांबरोबरच इतर ग्राहकांचाही मायलेजबरोबरच स्टायलिश बाईक खरेदीकडे ओढा दिसून येतो. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्वच वाहन उत्पादन करणाऱया कंपन्यांनी सर्वांच्याच पसंतीला पडतील, अशा स्टायलिश बाईक बाजारात आणल्या आहेत.
काही वाहन उत्पादन कंपन्यांनी असलेल्या वाहनात बदल करून त्यात वेगळेपणा असल्याचे सांगत किमतीचा ताळमेळ बसवत वाहने बाजारात आणली आहेत. स्टायलिश वाहन खरेदीसाठी प्रथम नंबर लावावा लागत असल्याने काही नागरिक तर मुहूर्तदेखील पाहत नाहीत. मुलांचे लाड पुरविण्यासाठी मनासारखे वहान मिळताच खरेदी केली जात आहे. या वाहन बाजारात वाहन खरेदीची चांगलीच ’धूम’ दिसून येत आहे.
सध्या दुचाकीमध्ये विशेषत: तरुणवर्ग स्टायलिश बाईककडे आकर्षित होत असल्याचे काही वाहन विपेत्यांनी सांगितले. पेट्रोलचे दर आकाशाला भिडलेले असल्याने दुचाकी मायलेज देणारी असावी, शिवाय ती स्टायलिशही असावी, असे ग्राहकांना वाटत असल्याचे विपेत्यांनी सांगितले.
स्टायलिश बाईकबरोबरच मनपसंद वाहनांचा नंबर घेण्याकडेदेखील अनेक तरुणांचा कल दिसून येत आहे. शाळा कॉलेजमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण व्हावी, तसेच आपली इतर तरुणांवर वेगळी छाप पडावी म्हणून काही तरुण मनपसंद वाहन क्रमांकासाठी हजारो रुपये खर्च करत आहेत. वाहन कार्यालयात नंबर लावण्यासाठी गर्दी होणार आहे तर कही तरुण वशिलेबाजी करत आहेत. काही आमदार, खासदार मोठे अधिकारी यांच्या ओळखीचा फायदा घेत वशिला लावत आहेत.