रुग्णांच्या नावासह पोस्ट व्हायरल, जिल्हा रुग्णालयाकडून खंडन
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जगभर धुमाकूळ घालणाऱया कोरोना व्हायरसने रत्नागिरीतही शिरकाव केल्याची पोस्ट रुग्ण व जिल्हा रुग्णालयाच्या नावासह मंगळवारी सायंकाळनंतर सोशल मीडीयावर व्हायरल झाल्याने रत्नागिरीकरांच्या मनात धस्स झाले. मात्र ही अफवाच असून अशाप्रकारचे कोणेतही रुग्ण दाखल नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ. अशोक बोल्डे यांनी पत्रकारांना सांगितले. ही अफवा पसरवणाऱयांवर कोणती कारवाई केली जाते याकडे लक्ष लागलेले असताना आरोग्य विभागाने याबाबत पोलिसांत साधी तक्रारही दाखल केली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
चीनमध्ये सापडलेल्या कोरोना व्हायरसचा जगभरात फैलाव सुरू झाला आहे. भारतातही केरळमध्ये कोरोनोचे रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. देशभर या आजाराबाबत दक्षता घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत कोरोनोचे दोन संशयित रुग्ण सापडल्याचे वृत्त सोशल मीडियावर फिरू लागले आणि रत्नागिरीकर भयभीत झाले. सोशल मीडियावरील या वृत्तानुसार रत्नागिरीतील शिवार आंबेरे येथील हे रुग्ण असल्याचे नमूद करून त्यांच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात तयार केलेल्या विशेष वॉर्डमध्ये उपचार सुरू असल्याचे म्हटले होते.
याबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले. सोशल मीडियावरील वृत्तात ज्या दोन रुग्णांची नावे देण्यात आली आहेत, त्या नावाचे रुग्ण कोरोनाच नव्हे तर अन्य कोणत्याच आजारासाठी रुग्णालयत दाखल नसल्याचे डॉ. बोल्डे यांनी स्पष्ट केले आहे.
कारवाईकडे लक्ष
या वृत्तात रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय व शिवार आंबेरी येथील दोघांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. या माध्यमातून रत्नागिरीकरांमध्ये भीती निर्माण करण्याचा खोडसाळपणा करणाऱया व्यक्तींविरोधात जिल्हा रुग्णालय प्रशासन तक्रार देणार का?, पोलीस व सायबर क्राईम विभाग असा खोडसाळपणा करणाऱयांविरोधात कडक कारवाई करणार का? याकडे लक्ष लागले आहे.
हुशार लोकांनी ओळखली अफवा…!
सोशल मीडियावरील पोस्ट वाचून रत्नागिरीतील अनेक सुजाण नागरिकांनी ही अफवा असल्याचे लगेचच ओळखले. या पोस्टमध्ये असलेले अनेक चुकीचे संदर्भ पाहून त्यांनी हा निष्कर्ष काढला. पोस्टमध्ये हे दोन तरुण चीनवरून विमानतळावर उतरताच वैद्यकीय तपासणीत कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना तत्काळ रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याचे म्हटले होते. मात्र रत्नागिरीतील विमानतळ अनेक वर्षे बंदच आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱयांनी तपासणी केल्याचे पोस्टमध्ये नमूद होते मात्र रत्नागिरीत नगर परिषद आहे महापालिका नाही. या दोन चुकीच्या संदर्भावरून ही अन्य ठिकाणच्या पोस्टमध्ये छेडछाड करून अफवा पसरवल्याचे अनेक हुशार रत्नागिरीकरांनी जाणले व पोस्टला ‘फेक मेसेज’ असा रिप्लायही दिला होता.
अफवांचे विषाणू, शासन-प्रशासन ढिम्म
सोशल मीडियावर पसरलेले भीतीदायक कोरोना विषाणूबाबतचे वृत्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी फेटाळून लावल्याने रत्नागिरीकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र, कोरोनापेक्षा भयानक वेगाने पसरणाऱया व कोणतीही खातरजमा न करता फॉरवर्ड होणाऱया या अफवांच्या विषाणूने मात्र सर्वांसमोर मोठी भीती व आव्हान निर्माण केले आहे. अफवांच्या या विषाणूवर जालीम लस टोचण्याची हीच खरी वेळ आहे. मात्र, याबाबत गांभिर्याने पाहण्याबाबत प्रशासनामध्ये नेहमीप्रमाणे उदासिनताच दिसून येत आहे. याबाबत ना आरोग्य विभागाने पोलिसात तक्रार नोंदवली ना पोलिसांनी सुमोटो कार्यवाही सुरु केली. एखाद्या लोकप्रतिनिधीनेही याबाबत ना मचौकशीची मागणी केली ना तक्रार केली.
तक्रार आल्यास कारवाई
आक्षेपार्ह किंवा खोटय़ा माहितीची पोस्ट समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्यास त्याविरुद्ध आलेल्या तक्रारीची योग्य चौकशी करुन उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोरोना व्हायरस संदर्भात खोटय़ा माहितीची पोस्ट व्हायरल झाली होती. परंतु आरोग्य विभागाकडून त्यासंदर्भात कोणतीही तक्रार अद्याप दाखल नाही.
– शिरीष सासरणे, प्रभारी पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम विभाग









