प्रतिनिधी/तासगाव
तासगाव तालुक्यासह इतर भागातील द्राक्षबागायतदारांचे फसवणुकीचे सत्र थांबता थांबेना झाले आहे. दहा बारा वर्षे विश्वासाने द्राक्ष खरेदी करुन आंधप्रदेश येथील दलालाने तासगावसह चार तालुक्यातील सुमारे 50 ते 55 द्राक्षबागायतदारांची तब्बल 2 कोटींची फसवणूक केल्याचे वृत्त आहे. या प्रकाराने तासगाव तालुक्यासह जिह्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. मात्र याबाबत पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत कोणतीही नोंद झाली नव्हती.
तासगावसह मिरज, जत व कवठेमहांकाळ या चार तालुक्यातील शेतकऱयांची फसवणूक झाल्याचे वृत्त आहे तर फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बाबाजान पठाण रसूल खान आणि पार्टनर दाऊद मे. बाबा प्रुट कंपनी, अनंतपुर, आंध्रप्रदेश सध्या रा. सावळज, डोंगरसोनी रोड (पुर्वी गव्हाण) असे या दलालाचे नाव असल्याचे शेतकऱयांनी सांगितले. या दलालाने सोमवारी रात्री पोबारा केला आहे. मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत तालुक्यात द्राक्ष खरेदीतून अनेक शेतकऱयांची फसवणूक केली आहे. या दलालाने दहा ते बारा वर्षे शेतकऱयांचा विश्वास संपादन करून पळ काढला. फसवणूक झाल्याचे समजताच तासगावसह जिह्यातील द्राक्ष बागायतदार शेतकरी हादरले आहेत. तासगाव पोलिसात याबाबत केवळ तक्रार अर्ज देण्यात आला आहे, असे ठाणे अंमलदार यांनी सांगितले.








