‘शाहीन बाग’मुद्दा महत्त्वाचा : मोदींच्या सभांमुळे भाजपचे बळ वाढणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रचारमोहिमेसह शाहीन बाग मुद्दय़ाचा भाजपला जबरदस्त लाभ होऊ शकतो. एका वृत्तवाहिनीच्या मतदानपूर्व सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून ही बाब समोर आली आहे. 61 टक्के लोकांनी मोदींच्या सभांमुळे भाजपला लाभ होणार असल्याचे म्हटले आहे. आम आदमी पक्षाला 42-56 तर भाजपला 10-24 जागा मिळण्याची शक्यता आहे.
शाहीन बागमधील आंदोलन चुकीचे असल्याचे 62 टक्के लोकांचे मत आहे. तर शाहीन बागचा मुद्दा राजकीय ठरल्याचे 83 टक्के जणांनी नमूद केले आहे. शाहीन बागच्या मुद्दय़ामुळे निवडणुकीत भाजपला लाभ होणार असल्याचे 39 टक्के लोकांनी म्हटले आहे. तर शाहीन बाग मुद्दय़ामुळे आम आदमी पक्षाला लाभ होणार असल्याचे 25 टक्के जणांचे म्हणणे आहे. केवळ 4 टक्के लोकांनी काँग्रेसला फायदा होणार असल्याचे मत नोंदविले आहे.
शाह यांच्या सभांमुळे भाजपला लाभ होणार असल्याचे 53 टक्के जणांनी म्हटले आहे. तर 29 टक्के लोकांना असे घडणार नसल्याचे वाटते. सर्व 70 मतदारसंघांमधील 11 हजारांहून अधिक लोकांशी संपर्क साधत विविध मुद्दय़ांवर त्यांचे मत मागितल्याचा दावा वृत्तवाहिनीने केला आहे. केजरीवालांना लक्ष्य पेल्याने भाजपला नुकसान होईल असे 48 टक्के जणांचे मत आहे. तर भाजपला कुठलाच तोटा होणार नसल्याचे 24 टक्के लोकांचे म्हणणे आहे.









