आज युवा पिढी मोबाईल, इंटरनेटच्या पूर्णपणे आहारी गेलेली आहे. व्यसनांकडेही वळत चाललेली आहेत. संस्कृतीपासून कुठेतरी दूर जात असल्याची भीती पालकवर्गामध्ये आहे. त्यामुळे संत साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचविणे काळाची गरज ठरते.
ज्यांनी अध्यात्माची कवाडे साऱया जगाला उघडून दिली, असे गोव्याचे थोर संतकवी सोहिरोबानाथ आंबिये यांची 306वी जयंती त्यांच्या बावाखानवाडा-पालये, पेडणे गोवा येथील जन्मस्थानी सोमवार दि. 10 फेब्रुवारी रोजी (गुरु प्रतिपदा) साजरी होणार आहे. यानिमित्त आज दि. 6 फेब्रुवारी रोजी पालये आयडियल हायस्कूलमध्ये खास वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशा या संतांच्या तसेच अन्य गोमंतकीय संतांच्या साहित्याचा प्रसार व प्रचार होणे, अत्यंत आवश्यक आहे. तसेच सोहिरोबानाथ आंबिये जन्मस्थळ पर्यटन स्थळ नव्हे तर तीर्थक्षेत्र होण्यासाठी सरकारने तसेच गोमंतकीयांनी पावले उचलणे आवश्यक ठरते.
दरवर्षी या संतांची जयंती गुरुप्रतिपदेला साजरी करण्यात येते. यासाठी पालये येथील आयडियल इंग्लिश हायस्कूल पुढाकार घेते. यंदाही आयडियल हायस्कूलने यासाठी पुढाकार घेतला असून पेडणे तालुका मर्यादित वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जलसंवर्धन काळाची गरज’ असा या स्पर्धेचा विषय आहे. या उपक्रमाला खरोखरच आयडियल हायस्कूलला धन्यवाद द्यावे लागतील. या विद्यालयाकडून खऱया अर्थाने संतकार्य होत असल्याने विद्यार्थ्यांसमोरही एक चांगला आदर्श निर्माण होण्यास मदत होणार आहे.
संत सोहिरोबानाथांचे सहावे वंशज डॉ. रामकृष्ण आंबिये हे मुंबईत स्थायिक असले तरी सोहिरोबानाथांच्या जयंतीदिनी त्यांचे बंधू, मुंबईतील सहकारीवर्ग या उत्सवाला आवर्जून उपस्थिती लावतात. एरव्ही सणासुदीला त्यांचे याठिकाणी येणे होतेच. डॉ. रामकृष्ण आंबिये आज वयाने 88 वर्षाचे असले तरी समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची धडपड आहे. मुंबईत जरी त्यांचे वास्तव्य असले तरी मूळ पालये गावाशी त्यांची नाळ जुळलेली आहे. येथेही त्यांचे समाजकार्य सुरू आहे. त्यांनी ब्रह्मचर्य जीवन व्यतीत केले आहे. कॅन्सर व जैव-वैद्यकीय शास्त्रात 35 वर्षे त्यांनी संशोधन केलेले आहे. मुंबईतील टाटा स्मारक केंद्रात निरनिराळय़ा पदांवर त्यांनी काम केले आहे. अनेक संस्थांशी ते संबंधित आहेत. केईएम, जे. जे. टाटा कॅन्सर, मोतीबेन दळवी यासारख्या मुंबईतील रुग्णालयात रुग्णांना प्रवेश, उपचार व प्रसंगी आर्थिक मदत व इतर देखरेख करणे यासारखे समाजसेवी कार्यही त्यांनी बजाविलेले आहे. जणू हे खऱया अर्थाने संतकार्यच म्हणावे लागेल. अमेरिकेत संधी असूनही त्यांनी आपले कर्तृत्व भारत देशात सिद्ध केले. सोहिरोबानाथांच्या जयंतीचे हे कार्य यापुढे अव्याहत सुरू राहावे, असा त्यांचा ध्यास आहे. संत सोहिरोबानाथांची जयंती गुरुप्रतिपदेला होत असली तरी त्यांची नेमकी जन्मतारीख अजून सापडलेली नाही. संशोधकांनी ती शोधून काढणे आव्हान ठरेल.
संत सोहिरोबानाथ यांची माडी असलेली वास्तू अजूनही डौलाने उभी आहे. गोवा मुक्ति संग्रामाच्यावेळी देशभरातून येणारे राजकीय पुढारी, कार्यकर्ते यांच्या बैठका या वास्तूच्या माडीवर घेतल्या गेल्या होत्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या नाथांच्या वास्तूला भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे. नामवंत साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनीही या वास्तूला भेट दिली होती. प्रख्यात संवादिनीवादक स्व. पं. तुळशीदास बोरकर यांनीही या निवासस्थानाला भेट दिली होती. त्यावेळी एक सोलो कार्यक्रमही घडवून आणला होता. अशाप्रकारे निसर्गाच्या सान्निध्यात असलेली ही वास्तू अनेकांना खुणावत असते. संतांच्या वास्तव्याची जाणीव करून देते. ज्या वास्तूत अशी असामान्य व्यक्ती जन्माला आली, त्या वास्तूचे जतन करून ती भावी पिढीसाठी आदर्शवत ठेवणे गरजेचे आहे. आज गोव्यात काही स्थळांचा पर्यटनदृष्टय़ा विकास केला असला तरी पर्यटनाच्या नावाखाली ही स्थळे बदनाम होत आहेत. सोहिरोबानाथ आंबिये यांच्या वास्तूचे संवर्धन होणे आवश्यक आहे. तसेच हा परिसर पर्यटन स्थळ नव्हे तर तीर्थक्षेत्र बनावे, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मांद्रे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांनी याबाबत विचार करायला हरकत नाही.
ज्याप्रमाणे विठोबा माउलींमुळे पंढरपूरला, संत तुकारामांमुळे देहूला त्याचप्रमाणे संतकवी सोहिरोबानाथ आंबिये यांच्यामुळे केवळ पालये गावालाच नव्हे तर संपूर्ण गोव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्या ज्या ठिकाणी मराठी विषयक कार्यक्रम म्हणा किंवा संमेलने भरविली जातात त्या त्यावेळी सोहिरोबानाथांचा व त्यांच्या साहित्य संपदेचा प्रामुख्याने उल्लेख होतो, ही गौरवास्पद बाब आहे. विर्नोडा येथील सरकारी महाविद्यालयाला संतकवी सोहिरोबानाथ आंबिये यांचे नाव देण्यात आले आहे. गोवा विद्यापीठातही खास अध्यासन सुरू करण्यात आले आहे. बांबोळी येथील रस्त्यालाही त्यांचे नाव देण्यात आले आहे. एकंदरीत सोहिरोबानाथांचा सरकारकडून उचित गौरव झालेला आहे. सोहिरोबानाथांना आत्मसाक्षात्कार झालेल्या इन्सुली-बांदा, सिंधुदुर्ग याठिकाणी त्यांचे मंदिर उभारण्यात आलेले आहे. सोहिरोबानाथांची जणू गोवा, महाराष्ट्र, ग्वाल्हेर, उज्जैनबरोबरच देशाला जोडणारी नाळ ठरली आहे व त्यांचे जणू ते दैवत बनले आहे.
आज युवा पिढी मोबाईल, इंटरनेटच्या पूर्णपणे आहारी गेलेली आहे. वाईट व्यसनांकडेही वळत चाललेली आहेत. संस्कृतीपासून कुठेतरी दूर जात असल्याची भीती पालकवर्गामध्ये आहे. त्यामुळे संत साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचविणे काळाची गरज ठरते. संत सोहिरोबानाथांची जयंती पेडणे तालुक्यातील पालये आयडियल इंग्लिश हायस्कूलतर्फे साजरी होत आहे. त्याचप्रमाणे गोव्यातील अन्य विद्यालयांनीही संतांचे कार्य तसेच त्यांचे साहित्यविषयक विविध उपक्रम राबवून गोमंतकीय संस्कृतीपासून दूर जात असलेल्या, वाममार्गाकडे वळणाऱया विद्यार्थ्यांना सन्मार्गाची दिशा देण्याचे कार्य करावे, असे नम्रपणे सुचवावेसे वाटते.
राजेश परब