प्रतिनिधी/ कराड
पोलीस कॉलन्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समिती निधीतून साडेतीन कोटी आणि पोलीस वाहनांच्या खरेदीसाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पोलिसांचा पेट्रोल पंप हा कराडला सुरु होत आहे. पोलिसांप्रमाणेच या पंपावर 24 तास सेवा मिळेल. महिनाभरात पंप ग्राहकांच्या सेवेत रुजू होईल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केले.
कराडच्या पोलीस वसाहतीत साकारणाऱया पेट्रोल पंपाच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. उपाधीक्षक सुरज गुरव, भारत पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी सुपले, ओंकार, गजेंद्र सिंह, साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अधीक्षक सातपुते म्हणाल्या, पोलीस कर्मचाऱयांना कुटुंबाकडे द्यायला वेळ नसतो. सुट्टीची खात्री नसते. त्यामुळे त्यांना तब्बेतीकडेही लक्ष द्यायला वेळ नसतो. पोलीस कल्याण निधीतून कर्मचाऱयांच्या मुलांना शिष्यवृत्ती, वह्या, पुस्तके, महिलांसाठी मातृत्व भत्ता, शैक्षणिक प्रवेशासाठी बिनव्याजी रक्कम उपलब्ध करणे आदी उपक्रम राबवले जातात. जिह्यात पहिल्यांदाच सातारा आणि कराडमध्ये पेट्रोल पंप प्रस्तावीत करण्यात आले होते. त्यातील सातारच्या पंपाची जागा योग्य नसल्याने कराडलाच पहिला पंप सुरु करण्यात येत आहे. येत्या महिनाभरात पेट्रोल पंप सुरु होईल. तो 24 तास सुरु राहून चांगली सेवा देण्यासाठी तत्पर असेल. पोलीस कल्याण निधी वाढवण्यासाठी जिह्यातील फलटण, वडुज, कोरेगाव, सातारा आणि महामार्गावर पोलीस ठाण्यांच्या परिसरात व अन्य ठिकाणीही पेट्रोल पंप सुरु करण्यात येतील.
सुरज गुरव म्हणाले, जिह्यात पोलीस कर्मचाऱयांच्या कल्याणासाठी पोलीस अधीक्षकांनी चांगले उपक्रम राबवले आहेत. विश्वासार्हता असणारा हा पोलिसांचा पंप ग्राहकांना चांगली सेवा देईल. पोलिसांच्या 12 वसाहतीत एक सोसायटी सुरु करण्यात येत आहे. त्यातून वसाहत सुसज्ज करण्याचा मानस आहे. भारत पेट्रोलीयम कंपनीचे सुपले म्हणाले, पोलिसांच्या पंपातून 24 तास सेवा मिळणार असून ग्राहकांत विश्वास निर्माण होऊन चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे. येत्या दीड महिन्यात पंपाचे काम पूर्ण होईल. यावेळी पेट्रोल पंपासाठी पाठपुरावा करणारे उपनिरीक्षक गणेश वाघ, कर्मचारी संजय जाधव यांचाही सत्कार करण्यात आला. महेंद्र भोसले यांनी सूत्रसंचालन केले.









