प्रतिनिधी / वाकरे
कुडित्रे (ता.करवीर) येथील सौरभ सुभाष पाटील (वय २४) या युवकाचा मूत्रपिंड निकामी झाल्याने मंगळवारी पहाटे मृत्यू झाला, मात्र गावात त्याला पब्जीच्या गेममुळे शुद्ध राहत नसल्याने आणि अधिक वेळ गेम खेळत राहिल्याने मूत्रपिंडावर ताण पडून ती निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे. गेले आठ दिवस त्याच्यावर कोल्हापूरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
सौरभचे दहावीपर्यंत शिक्षण झाले होते.त्यांनतर त्याने शिक्षण बंद केले होते.अलीकडे युवकांमध्ये रिकाम्या वेळेत मोबाईलवर पब्जी गेम खेळण्याची सवय व्यसन बनू जाऊ लागली आहे.असाच काहीसा प्रकार सौरभच्या बाबतीत घडल्याचे गावात बोलले जात आहे. सौरभ रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर पब्जी गेम खेळत असे,त्याला जेवणाची सुध्दा शुद्ध राहत नव्हती.
मित्रांबरोबर ग्रुप गेम खेळण्याची सवय जडली असल्याने एकदा गेम सुरू झाली की रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत तो मोबाईलमध्ये गेम खेळण्यात गुंग असायचा असे बोलले जात आहे. त्याला घरच्यांनी याबाबत वारंवार सुचना करूनही त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे समजते.
सौरभ ही गेम खेळताना एवढा गुंग व्हायचा की त्याला आपल्या नैसर्गिक विधीचीही आठवण राहत नव्हती.याचा परिणाम त्याच्या शरीरावर झाला आणि यातून त्याला मुत्रपिंडाचा आजार झाला.त्यानंतर त्याला उपचारासाठी कोल्हापूरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.पण हा आजार एवढा बळावला की यात उपचार सुरू असताना त्याचे मूत्रपिंड निकामी झाल्याने मंगळवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.पब्जी गेमच्या वेडापाई या युवकाचा बळी गेल्याने आता पालकांनी आपल्या मुलांच्या बाबतीत अधिक सतर्क होण्याची गरज आहे.