लंडन/ वृत्तसंस्था
2007 मधील टी-20 विश्वचषक स्पर्धा. भारत-इंग्लंडचे संघ आमनेसामने भिडत असताना युवराज स्ट्राईकवर होता. त्याने प्रतिस्पर्धी जलद गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला 6 चेंडूंवर 6 उत्तूंग षटकार खेचले आणि एकाच षटकात सर्वाधिक 36 धावांची आतषबाजी केली. टी-20 क्रिकेटमधील हेच सर्वात महागडे षटक. पण, आयसीसीने याच पार्श्वभूमीवर टी-20 क्रिकेटमधील सर्वात महागडे षटक कोणी टाकले, अशा आशयाचा प्रश्न विचारला तेव्हा ब्रॉडच्याच नकारार्थी उत्तराची सोशल नेटवर्कवर गोडीने चर्चा झाली.
‘शिवम दुबेने टी-20 क्रिकेट इतिहासातील दुसरी सर्वात महागडी गोलंदाजी केली. सर्वात महागडा गोलंदाज कोण, याची आपल्याला कल्पना आहे का’? असा सवाल आयसीसीने विचारला होता आणि टी-20 मधील सर्वात महागडा गोलंदाज दस्तुरखुद्द स्टुअर्ट ब्रॉडनेच चटकन उत्तर दिले, नाही आठवत!
रविवारी शिवम दुबेच्या एका षटकात 34 धावांची आतषबाजी झाल्यानंतर ब्रॉडच्या त्या महागडय़ा षटकाच्या आठवणीला उजाळा मिळाला. त्या पार्श्वभूमीवर आयसीसीने त्यासंदर्भात प्रश्न विचारला आणि खुद्द स्टुअर्ट ब्रॉडनेच ‘नाही’ असे उत्तर दिल्यानंतर ते सोशल नेटवर्कवर ट्रोल होत गेले.
न्यूझीलंडला 11 षटकात 100 धावांची आवश्यकता असताना शिवम दुबे गोलंदाजीला आला आणि त्याच्या पहिल्या दोन चेंडूंवर टीम सेफर्टने लागोपाठ दोन षटकार खेचले. त्यानंतर एक चौकार व एकेरी धाव त्याने घेतली. पुढे स्ट्राईकवर आलेल्या रॉस टेलरने नोबॉलवर चौकार ठोकला व नंतर लागोपाठ दोन षटकार फटकावले. या एकाच षटकातील 34 धावांनंतर न्यूझीलंडसमोर उर्वरित 10 षटकात 66 धावांची आवश्यकता होती. अर्थात, यानंतरही हा सामना जिंकण्यात त्यांना यश आले नाही.









