अटकेतील दहशतवाद्याचा चौकशीदरम्यान खुलासा : अमेरिकन गनही उपलब्ध
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आरोपी आदिल डारचा भाऊ समीरने सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या चौकशीत अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. डिसेंबर 2019 मध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना त्याने काश्मीर खोऱयात पोहोचविले होते. नगरोटा येथे पोलिसांनी समीरला शुक्रवारी अटक केली होती. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांकडे एम-4 कार्बाइन आणि स्टीलची काडतूसे असल्याची माहिती समीरने चौकशीदरम्यान दिली आहे.
पुलवामा जिल्हय़ातील काकापोरा येथे राहणाऱया समीरने दहशतवाद्यांकडे सामान्य चिलखती वाहनांना भेदण्यास सक्षम ‘स्टीलच्या काडतुसां’सह मोठय़ा प्रमाणात दारुगोळा असल्याचे मान्य केले आहे. 14 फेब्रुवारी रोजी समीरचा नातलग असलेल्या आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यावर आदळवून स्फोट घडवून आणला होता. या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. सीमेपलिकडून घुसखोरी सुरूच असून द. काश्मीरच्या विविध भागांमध्ये दहशतवादी सक्रीय आहेत.









