…म्हणे स्वातंत्र्यासाठी गांधीजींनी केलेला सत्याग्रह नाटक होते
प्रतिनिधी/ बेंगळूर
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे भाजप खासदार अनंतकुमार हेगडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात विरोधी पक्षातील नेत्यांनी टिकेची झोड उठविली आहे. हेगडेंनी जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी होत आहे.
नेहमी वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणारे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात महात्मा गांधीजींबद्दल अवमानकारक विधान केले आहे. गांधीजींनी केलेला सत्याग्रह हे एक नाटक होते. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात तीन प्रकारचे लोक सहभागी झाले होते. क्रांतिकारी, प्रखर विचारसरणीद्वारे जनतेला प्रेरणा देणारे आणि ब्रिटीशांशी तडजोड करून उपोषण व सत्याग्रह करणारे. त्यापैकी तिसऱया प्रकारचे लोक आपण आंदोलन कसे करावे, असे ब्रिटीशांनाच विचारत होते. उपोषण सत्याग्रह केलेल्यांमुळे देश स्वतंत्र झाला, असे सांगण्यात येत आहे. आंदोलनांना घाबरून ब्रिटीशांनी भारतावरील अंमल सोडण्याचा निर्णय घेतला. असा इतिहास सांगितल्यामुळे असे लोकच महात्मा बनले आहे, अशी विधाने हेगडेंनी गांधीजींविरुद्ध केली आहेत.
देशासाठी हातात शस्त्रे घेतलेले फासावर गेले. ब्रिटीशांसोबत तडजोड केलेले इतिहासाच्या पुस्तकात स्वातंत्र्याचे अग्रणी ठरले. अशा नेत्यांना एकदाही लाठी झेलावी लागली नाही. त्यामुळे ही चळवळ ब्रिटींशांच्या संगनमताचे केलेले ढोंग होतं, असे वादग्रस्त विधान हेगडेंनी केले आहे. त्यामुळे काँग्रेससह विविध पक्षातील नेते आणि संघटनांनी हेगडेंविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.
लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार
वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजेश काळप्पा यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली आहे. अनंतकुमार हेगडे यांना अपात्र ठरवावे, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे. लोकसभा नियम नियम 102 अंतर्गत हेगडेंचे खासदारपद रद्द करावे, अशी मागणीही ब्रिजेश काळप्पा यांनी केली आहे. शिवाय या पत्राची प्रत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडेही पाठवून दिली आहे.









