प्रतिनिधी / ओरोस:
बऱयाच वर्षानंतर पुन्हा एकदा बाईक चोरीचे प्रकार जिल्हय़ात वाढत आहेत. कुडाळ पाठोपाठ ओरोसमधील सर्जेराव आनंदा भोवड यांची रॉयल एनफिल्ड बुलेट चोरीला गेली आहे. ओरोस पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सर्जेराव भोवड हे सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत आहेत. सध्या ते ओरोस-भवानी मंदिर नजीकच्या नार्वेकर यांच्या घरात भाडय़ाने राहतात. शनिवारी 1 रोजी रात्री त्यांनी आपली बुलेट (एम.एच.-09-डी.एस.-9075)ते भाडय़ाने राहत असलेल्या घराच्या अंगणात हँडल लॉक करून ठेवली होती. दरम्यान, रविवारी सकाळी 8.45 ते ओरोस बाजारात जाण्यासाठी निघाले असता पार्क केलेल्या जागेवर बुलेट नसल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर त्यांनी या गाडीचा शोध घेतला. मात्र, ती आढळली नाही. त्यामुळे त्यांनी सोमवारी 3 रोजी ओरोस पोलीस स्थानकात धाव घेत बुलेट चोरी झाल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी याबाबतचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक सचिन गवस करीत आहेत.









