गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकीला अपघात
प्रतिनिधी / वेंगुर्ले:
कझाकस्थान येथील कोनस्टेंवीन कार्यालनिंचेव (29) हा पर्यटक सोमवारी दुचाकीने आरवलीहून गोव्याच्या दिशेने सहकाऱयासमवेत जात असता शिरोडा-राऊतवाडी येथील गतिरोधकाचा अंदाज न आल्याने त्याचा दुचाकीवरील ताबा सुटून ती रस्त्यावरील विजेच्या खांबास धडकली. या अपघातात या पर्यटकाच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत मारहिनेस्को विक्टर इगोर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
कार्यालनिंचेव हा कझाकस्थान देशातील तरुण आरवली वेळागर येथे सहकाऱयासमवेत पर्यटनासाठी आला होता. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हे दोघे गोव्यातील केरीच्या दिशेने जात होते. शिरोडा राऊतवाडी येथील गतिरोधकाचा अंदाज न आल्याने कार्यालनिंचेव याचा दुचाकीवरील ताबा सुटला. दुचाकी उडून रस्त्यालगतच्या विजेच्या खांबास धडकली. या अपघातात कार्यालनिंचेव याच्या डोक्याला व उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. सोबतच्या सहकाऱयाने यावेळी रस्त्यानजीक राहणाऱया ग्रामस्थांचे दरवाजे ठोठावले. परंतु पहाटेची वेळ असल्यामुळे तात्काळ कोणी बाहेर आले नाही. त्यामुळे पुन्हा तो आपल्या मित्रांना सांगण्यासाठी वेळागर येथे गेला व सहकाऱयांसमवेत घटनास्थळी दाखल झाला.
दरम्यान, अमित राऊत, गौरव राऊत, विठ्ठल राऊत, विवेक पवार, विनोद राऊत, सिद्धेश राऊत, बाबल गावडे व सिद्धेश परब या ग्रामस्थांनी सदर पर्यटकास त्वरित उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच सदर त्याचे निधन झाले होते. सदर घटनेची माहिती वेंगुर्ले पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांना देण्यात आली. शिरोडा पोलीस स्टेशनचे गजेंद्र भिसे व वेंगुर्लेकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला. अधिक तपास वेंगुर्ले पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक व्ही. व्ही. पाटील, गजेंद्र भिसे, वेंगुर्लेकर करीत आहेत.









