प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ येथील मारुती गल्लीतील ड्रेनेज वाहिन्या नव्याने घालण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र, ड्रेनेज वाहिन्यासाठी खोदण्यात आलेल्या चरी व्यवस्थित बुजविल्या नसल्याने वाहने अडकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. यामुळे वाहनधारकांसह परिसरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ड्रेनेज वाहिन्या घालण्याचे काम व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी अनेकवेळा करण्यात आल्या. पण याची दखल जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पाणीपुरवठा मंडळाने घेतली नाही. त्यामुळे याचा फटका नागरिकांना बसत आहे. ठिकठिकाणी खोदण्यात आलेल्याचरी व्यवस्थित बुजविण्यात आल्या नाहीत. यापूर्वी ड्रेनेज वाहिनीचे काम संथगतीने सुरू होते. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. पण आता हे काम पूर्ण झाल्यानेदेखील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खोदण्यात आलेल्या चरी व्यवस्थित बुजविण्यात आल्या नसल्याने अवजड व दुचाकी वाहने अडकण्याचे प्रकार सुरू आहेत. रविवारी अवजड वाहन अडकल्य़ाने संपूर्ण रस्ता बंद झाला. वाहनांमुळे ड्रेनेज वाहिनीला देखील गळती लागली. त्यामुळे परिसरात सांडपाणी साचले. दुर्गंधीबरोबरच रस्ता खचल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. खोदण्यात आलेल्या चरी व्यवस्थित बुजविण्याची मागणी परिसरातील रहिवासी करीत आहेत.









