ऑनलाईन टीम / पुणे :
गेल्या आठ वर्षांपासून भारताच्या विविध शहरांमध्ये पार पडणारा ‘मीडिया महोत्सव’ यंदाच्या वषी भोपाळमध्ये होणार आहे. ‘भारत का अभ्युदयः मीडिया की भूमिका’ या विषयावर शनिवार 22 आणि रविवार 23 फेब्रुवारी 2020 रोजी हा महोत्सव पार पडणार आहे, अशी माहिती आयोजन समितीचे सचिव डॉ. अनिल सौमित्र यांनी दिली.
यंदा भोपाळमधील इंदिरा गाधी राष्ट्रीय मानव संग्रहालय येथे ‘मीडिया महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. भारताचा अभ्युदय आणि माध्यमांची भूमिका या विषयावर आयोजित परिसंवाद आणि चर्चांमध्ये देशभरातील मान्यवर सहभागी होणार आहे. संपादक, लेखक, डिजिटल मीडिया, संवादाची पारंपरिक माध्यमे आणि एनजीओ-सीएसआर अशी वेगवेगळय़ा माध्यमांतील तज्ञ आणि अनुभवी मडळी सहभागी होणार असून, वेगवेगळय़ा सत्रांमध्ये आपापली भूमिका मांडणार आहेत.
देशभरातील एक हजारांहून अधिक माध्यमकर्मी, विविध राजकीय पक्षांचे प्रवक्ते, लेखक, सोशल मीडियावर सक्रिय असलेली मंडळी, चित्रपट तथा नाट्य क्षेत्रातील मान्यवर या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे देशभरातील विविध प्रांतातील लोकप्रिय खाद्यपदार्थ आणि पारंपरिक कला यांचे सादरीकरण ‘व्यंजन आणि मनोरंजन’ या कार्यक्रमांतर्गत करण्यात येईल. यापूर्वी भोपाळ, ग्वाल्हेर, दिल्ली, हरिद्वार आणि चित्रकूट येथे मीडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.









