प्रतिनिधी / बांदा:
इन्सुली-परबवाडी येथील श्री देवी माऊली मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरटय़ाने गुरुवारी मध्यरात्री चोरून नेली होती. ती फंडपेटी मंदिरापासून सुमारे दोनशे मीटरवर असलेल्या काजूच्या बागेत आढळली. फंडपेटीचे कुलूप तोडून चोरटय़ाने रक्कम लंपास केली. याबाबतची माहिती मिळताच बांदा पोलीस घटनास्थळी दाखल होत फंडपेटी ताब्यात घेतली.
गुरुवारी मध्यरात्री येथील श्री देवी माऊली मंदिरातील फंडपेटी चोरीस गेली होती. याबाबत शुक्रवारी येथील मानकरी रामा दत्ताराम परब यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. सुमारे 2 हजार रुपयांची फंडपेटी व 300 रुपये रोख चोरीस गेल्याचे फिर्यादीत म्हटले होते.
शनिवारी दुपारी मंदिरापासून सुमारे 200 मीटर अंतरावर असलेल्या काजूच्या बागेत फंडपेटी असल्याचे तेथील ग्रामस्थांना दिसले. याबाबतची माहिती त्यांनी बांदा पोलिसांना दिली. हेड कॉन्स्टेबल प्रशांत पवार व सहकाऱयांनी घटनास्थळी पंचनामा करून फंडपेटी ताब्यात घेतली. फंडपेटीतील रोख रक्कम कुलूप फोडून चोरटय़ाने लंपास केली.









