ओम सूर्याय नमः ओम भास्कराय नमः ओम रवये नमः अशा सूर्यदेवतेच्या नाम गजराने शनिवारी सकाळी शहर परिसरात सूर्यनमस्काराचा जागर झाला. शहर आणि परिसरात शनिवारी सकाळी जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या निमित्ताने सूर्य देवतेच्या वंदनाचा सोहळा पार पडला. विविध संस्थांनी या ठिकाणी सूर्यनमस्कार आवर्तनाचे आयोजन केले होते. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिकांनी भाग घेऊन सूर्यनमस्काराचा उपक्रम यशस्वी केला.
रथसप्तमीच्या निमित्ताने जागतिक सूर्यनमस्कार दिन सर्वत्र साजरा केला जातो. केवळ धार्मिक स्वरूपाचे नसून आरोग्याच्या दृष्टीने देखील या दिवसाचे महत्त्व जाणले जावे याकरिता या दिनाचे आयोजन करण्यात येते. अशी माहिती अनेक ठिकाणी आयोजित कार्यक्रमात सांगण्यात आली.
किल्ला येथील रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे विविध योग संस्थांच्या माध्यमातून हा दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. दैनंदिन स्वरुपात योगासने करण्याबरोबरच सूर्यनमस्कार करण्याचे धडे याद्वारे देण्यात आले. येथील क्रीडा भारती आणि पतंजली योग संस्था यांच्या सहकार्याने अनगोळ येथे सामूहिक सूर्यनमस्काराचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि प्राध्यापक वर्गही सहभागी झाले होते. त्याचबरोबर शहरात अन्य विविध ठिकाणी सूर्यनमस्काराची आवर्तने पार पडली.









