प्रतिनिधी/ बेळगाव
कणबर्गी गावाच्या प्रवेशद्वारावरील तलावात जनावरांना पाणी पाजण्यासाठी रस्ता सोडण्याची मागणी करण्यात आली होती. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शेतकऱयांनी शुक्रवारी स्मार्ट सिटी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. यावेळी अभियंत्यांनी तात्काळ तलावाची पाहणी करून रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले. यामुळे अखेर शेतकऱयांच्या आंदोलनाला यश आले आहे.
सदर तलावाचे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुशोभिकरण आणि विकास करण्यात येत आहे. याकरिता संपूर्ण तलावाभोवती संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. तसेच याठिकाणी उद्यान, एमपी थिएटर, गाळे आदीसह नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पण गावात असलेल्या चार तलावांपैकी या एकाच तलावामध्ये बारा महिने पाणी असते. यामुळे गावातील जनावरांना पाणी पाजण्यासाठी या तलावातील पाण्याचा वापर केला जातो. पण विकासाच्या नावाखाली तलावाला संरक्षक भिंत घालण्यात येत असल्याने जनावरांना पाणी पाजण्याचा मार्ग बंद झाला आहे. यामुळे कणबर्गी येथील सिद्धेश्वर शेतकरी संघटना आणि नागरिकांच्यावतीने महापालिका, स्मार्ट सिटी, जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन जनावरांना तलावाकडे ये-जा करण्यासाठी रस्ता सोडण्याची मागणी करण्यात आली होती. पण या मागणीकडे स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केल्याने स्मार्ट सिटी कंपनीचे चेअरमन राकेश सिंग यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे दुसरा तलाव उपलब्ध होईपर्यंत या तलावात जनावरांना ये-जा करण्यासाठी रस्ता खुला ठेवण्याची सूचना स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांना केली होती. पण याची दखल गांभीर्याने घेण्यात आली नसल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱयांनी शुक्रवारी बुडा कार्यालयातील स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला.
तलावाकडे जाण्याचा रस्ता खुला करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी स्मार्ट सिटी कंपनीच्या अभियंत्यांनी शेतकऱयांचे निवेदन स्वीकारून चर्चा केली. जनावरांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने गावाच्या बाजूने रस्ता सोडण्याची सूचना माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी शेतकऱयांच्यावतीने केली. जनावरांसाठी रस्ता सोडण्याचा निर्णय स्मार्ट सिटी कंपनीने घेतला असून पाहणी करून रस्ता सोडण्यात येईल, असे सांगितले.
स्मार्ट सिटी कंपनीच्या अभियंत्यांनी दुपारी तलावाच्या ठिकाणी पाहणी केली. जनावरे गावाजवळ असलेल्या विसर्जन कुंडाजवळून तलावात उतरत असतात. यामुळे याठिकाणी घालण्यात आलेल्या लोखंडी सळय़ा काढून रस्ता करण्याची विनंती शेतकरी व किसन सुंठकर यांनी केली. यावेळी पाहणी केल्यानंतर सळय़ा काढून माती घालून रस्ता करून देण्यात येईल, असे अभियंत्यांनी सागितले. यामुळे रस्ता करण्याचा मार्ग मोगळा झाला असून शेतकऱयांच्या आंदोलनाला यश आले आहे.









