प्रतिनिधी/कोल्हापूर
आरळे (ता. करवीर) येथील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पांडूरंग रामचंद्र देसाई (वय 55) यांच्या खून प्रकरणी आरोपी सुरेश भाऊसाहेब पाटील (वय 43, रा. आरळे, ता. करवीर)याला सत्र न्यायालयाने गुरूवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. विठलानी यांनी हा निकाल दिला. 21 फेब्रुवारी 2008 रोजी सुरेश पाटील याने राजकीय वैमनस्यातून गोळी झाडून देसाई यांचा खून केला होता. याप्रकरणातील अन्य संशयित आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
सरकारी वकील ऍड. एन.बी.आयरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरळे येथे 2008 साली सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्याचा राग भरत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होता. या कारणावरुन तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हिंदुराव विष्णू पाटील आणि भारत पाटील या दोन गटामध्ये वैमनस्य निर्माण झाले होते. 21 फेब्रुवारी, 2008 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हिंदुराव पाटील यांच्या संस्थेच्या शाळेच्या पटांगणात भरत पाटील व त्यांच्या गटातील कार्यकर्ते काठय़ा कुऱहाडी व तलवार आदी शस्त्रs घेवून आले. त्यांनी हिंदुराव पाटील गटातील कार्यकर्त्यांवर आणि संस्थेचे उपाध्यक्ष पांडूरंग देसाई यांच्यावर हल्ला केला होता. सुरेश पाटील यांनी बंदुकीने पांडूरंग देसाई यांच्यावर गोळय़ा झाडल्या. ते जागीच ठार झाले. पोलिसांनी सुरेश पाटील, भरत पाटील यांच्यासह पांडूरंग दिनकर पाटील, बाजीराव निवृत्ती पाटील, तानाजी मारूती पाटील, नामदेव निवृत्ती पाटील (सर्व रा. आरळे ) यांच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. करवीरचे तत्कालीन पोलिस निरीक्षक धनंजय भांगे यांनी तपास केला होता. सरकार पक्षातर्फे 13 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी तानाजी तानुगडे, शहाजी कांबळे, सुधीर अमणगी, ज्ञानदेव देसाई या साक्षीदारांसह वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा पाटील, तपास अधिकारी धनंजय भांगे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरली. त्यासह न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा बॅलेस्टीक अहवाल आणि सबळ पुराव्याच्या आधारे आरोपी सुरेश पाटील याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यासह पाच हजार रूपये दंड दंड न भरल्यास सहा महिन्याचा तुरूंगवास अशी शिक्षा ठोठवली.
सरकारी वकीलांचा युक्तीवाद ठरला मोलाचा
या खटल्यात सरकारी वकील एन. बी. आयरेकर यांनी सर्वोच्च न्यायालयातील निवाडय़ांची मांडणी केली. तसेच निवाडय़ांचे दाखले न्यायालयापुढे सादर केले. ते आरोपीला शिक्षा होण्यासाठी उपयुक्त ठरले. ऍड. आयरेकर यांना पैरवी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. डी. सूर्यवंशी, हवालदार संदीप आबीटकर, कॉन्स्टेबल एम. एम. वाडकर यांचे सहकार्य लाभले.