प्रतिनिधी / कराड
कराड जनता सहकारी बँकेने ठेवीदारांच्या तोंडाला पाने पुसली असून ठेवीदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बँकेच्या कारभारावर संतापलेल्या ठेवीदारांनी शनिवारी बँकेच्या कराड येथील मुख्य कार्यालयात ठिय्या मारला. ठेवीदारांनी बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील–वाठारकर यांना घेराव घालत त्यांच्यावर प्रचंड रोष व्यक्त केला. वाठारकर यांच्यासमोर भडकलेल्या ठेवीदारांनी आपल्या व्यथा मांडल्या.
गेल्या अडीच वर्षापासून कराड जनता सहकारी बँकेत सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. ठेवीदारांनी आयुष्यभर कमावलेली रक्कम बँकेत ठेवली मात्र बँकेच्या पदाधिकाऱयांसह प्रशासनाने ठेवीदारांची घोर फसवणूक केली आहे. सध्या बँक अडचणीत आली असून त्याला बँकेच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ जबाबदार असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला. शनिवारी संतापलेल्या ठेवीदारांनी बँकेच्या मुख्य कार्यालयात धडक मारत आंदोलन केले. अध्यक्षांना घेराव घालत आमच्या ठेवी परत करा अशी मागणी लावून धरली. सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनाही ठेवीदारांनी निवेदन दिले आहे. सहकारमंत्र्यांनी ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.