वृत्तसंस्था/ बर्मिंगहम
येथे झालेल्या लीग चषक स्पर्धेत ट्रेझेग्यूने स्टॉपेज टाईममध्ये नोंदवलेल्या गोलाच्या बळावर ऍस्टन व्हिलाने लीसेस्टरवर 2-1 असा विजय मिळवित दहा वर्षात पहिल्यांदाच स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. दोन टप्प्यातील ही लढत ऍस्टन व्हिलाने 3-2 फरकाने जिंकली.
मॅट टार्गेटने व्हिलाला लवकर आघाडी मिळवून दिली. पण लीस्टरशायरने चेंडू बराच वेळ आपल्या ताब्यात ठेवत अनेक संधीही मिळविल्या आणि 18 व्या मिनिटाला त्यांना बरोबरी साधण्यात यशही आले. केलेची इहीनाचोने हा गोल नोंदवला. स्टॉपेज टाईममधील तिसऱया मिनिटाला ट्रेझेग्यूने अहमद इल मोहमदीने दिलेल्या क्रॉसवर ताबा घेत निर्णायक गोल नोंदवून लीसेस्टरशायरचे आव्हान संपुष्टात आणले. आता 1 मार्च रोजी वेम्ब्ली येथे मँचेस्टर युनायटेड किंवा मँचेस्टर सिटी यापैकी एकाशी त्यांची जेतेपदाची लढत होणार आहे.









