वार्ताहर/तुडये
उसाने भरलेल्या ट्रक्टरला भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने युवक जागीच ठार होण्याची दुर्घटना बुधवारी सकाळी 7 वाजता तुडये-म्हाळुंगे खालसा रस्त्यावर मळवी नजिकच्या वळणावर घडली. कल्लाप्पा भैरू किणयेकर (वय.27) रा. मळवीवाडी-तुडये असे मृत युवकाचे नाव आहे.
तुडयेकडून म्हाळुंगे खालसा येथील इको शुगर केनकडे ऊस वाहतुक करणारा डबल ट्रॉलीचा ट्रक्टर (एम.एच.09सी.टी.7314) जात होता. मळवीवाडी येथील कलाप्पा किणयेकर हा (एम.एच.09 डी.के. 2940) या हिरोहोंडा स्प्लेंडर स्मार्ट दुचाकीवरून भरधाव वेगाने तुडयेकडे निघाला होता. त्याची जोराची धडक ट्रक्टरच्या उजव्या बाजूच्या मोठय़ा टायरला बसली. आणि गाडीसह तो रस्त्याच्या बाजूस फेकला गेला. त्यात तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच मळवीवाडी व तुडये येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी मोठी गर्दी केली. परिणामी बराचवेळ वाहतूक ठप्प झाली. घटनेची वर्दी रमेश पाटील यांनी चंदगड पोलीसात दिल्यानंतर सहाय्यक फौजदार अजित कंग्राळकर, विश्वजित गाडवे, जमीर मकानदार, सुर्यकांत सुतार यांनी अपघाताचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनानंतर मृतदेह नातवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत कल्लाप्पाच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.









