इस्रायलने ठरविले ऐतिहासिक : पॅलेस्टाईने फेटाळला प्रस्ताव : जागतिक नेत्यांचा पाठिंबा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी तोडगा मांडला आहे. मध्यपूर्व शांतता योजेनेत ट्रम्प यांनी जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून कायम ठेवण्याचा प्रस्ताव मांडल्याने पॅलेस्टाईनने तो नाकारला आहे. ट्रम्प यांनी प्रस्तावाला ऐतिहासिक ठरवत हा या वादावरील ‘अंतिम तोडगा’ असल्याचे संकेत दिले आहेत.
व्हाईट हाउसमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या उपस्थितीत ट्रम्प यांनी जगातील सर्वात प्रदीर्घ वादावर दोन-राष्ट्रांचा तोडगा मांडला आहे. हा प्रस्ताव अंमलात आणल्यास शांतता प्रस्थापित होणार असून कुठल्याच इस्रायली तसेच पॅलेस्टिनी नागरिकाला स्वतःचे घर सोडावे लागणार नाही. जेरूसलेम इस्रायलची अविभाजित राजधानी राहणार आहे. 4 वर्षांपर्यंत क्षेत्रातील इस्रायलची वसाहतनिर्मिती रोखली जाईल आणि पॅलेस्टाईनचे क्षेत्र दुप्पट केले जाणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
शतकातील सर्वात मोठा करार
पॅलेस्टाईनसाठी ट्रम्प यांनी पूर्व जेरूसलेमला राजधानीचा दर्जा देण्याचा तसेच तेथे अमेरिकेचा दूतावास स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या तोडग्याचा स्वीकार करून क्षेत्रात प्रस्थापित करण्याचे आवाहन ट्रम्प यांनी पॅलेस्टाईनला केले आहे. आपला प्रस्ताव ऐतिहासिक आणि शतकातील सर्वात मोठा करार ठरणार असल्याचा दावा करत ट्रम्प यांनी जागतिक नेत्यांचे समर्थन प्राप्त असल्याचे म्हटले आहे. पॅलेस्टाईनसमोर स्वतंत्र देश होण्याची ऐतिहासिक संधी असून राष्ट्रपती महमूद अब्बास यांना याप्रकरणी पत्र लिहिल्याचे ट्रम्प म्हणाले.
इस्रायलकडून स्वागत
ट्रम्प यांच्या योजनेला ऐतिहासिक ठरवत नेतान्याहू यांनी याची तुलना हॅरी ट्रूमन यांच्याशी केली आहे. अन्य सर्व योजना अपयशी ठरल्या असून ट्रम्प यांचा प्रस्ताव अत्यंत संतुलित आहे. या प्रस्तावाच्या आधारावर पॅलेस्टाईनशी शांतता करार करण्यास तयार असल्याचे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.
पॅलेस्टाईनची नकारघंटा
ट्रम्प यांच्या प्रस्तावाच्या घोषणेवेळी पॅलेस्टाईनचा पदाधिकारी उपस्थित नव्हता. तर ओमान, संयुक्त अरब अमिरात आणि बहारीनचे राजदूत व्हाईट हाउसमध्ये उपस्थित होते. शांततेच्या मार्गाने इस्रायलला विरोध करत राहणार असल्याचे पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास म्हणाले.
इस्रायल-पॅलेस्टाईनवर अवलंबून
अमेरिका इस्रायलसोबत संयुक्त समिती स्थापन करणार असून एक विस्तृत आराखडा तयार केला जाईल. पॅलेस्टाईनमध्ये क्षेत्र विकसित करून दहशतवादाच्या उच्चाटनासाठी पावले उचलली जातील, असे ट्रम्प यांनी सांगितले आहे.
अमेरिकेकडून अर्थसहाय्य
पॅलेस्टाईनच्या अर्थव्यवस्थेला सहाय्य करण्यासाठी 50 अब्ज डॉलर्सच्या अर्थसंकल्पाचा योजनेत समावेश आहे. या निधीतून पॅलेस्टाईनच्या शरणार्थींना त्रयस्थ देशात स्थायिक होण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. पॅलेस्टाईनसाठी हायफा आणि अश्दोद बंदर, मृत समुद्राच्या उत्तर किनाऱयावर रिजॉर्टचा विकास आणि जॉर्डनच्या खोऱयात कृषी विकासासाठी हा निधी महत्त्वाचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.









