ऑनलाईन टीम / मुंबई :
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात बहुजन क्रांती मोर्चाने आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला आज धुळे, जळगाव आणि अकोल्यात हिंसक वळण लागले आहे.
भारत बंद दरम्यान आंदोलकांनी शिरपुरला बसवर दगडफेक केली. यामध्ये एक जण किरकोळ जखमी झाला आहे. तर धुळय़ात साक्री रोडवर टायर जाळण्यात आले आहेत. अकोल्यात काही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करत दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईमध्येही काही आंदोलकांनी कांजूरमार्ग स्थानकाजवळ अर्धा तास रेले रोको केला होता. त्यामुळे आज सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा, डीएनए आधारित एनआरसी करा, ईव्हीएम बंद करा व देश वाचवा या प्रमुख मागण्यांसाठी आज बहुजन क्रांती मोर्चाकडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे.
मुंबईमधील व्यापाऱयांनी या बंदमध्ये सहभाग घेत सीएए, एनआरसी व एनपीआर कायद्याला विरोध दर्शविणारे फलक दुकानाबाहेर लावले आहेत.









