प्रतिनिधी/ निपाणी
अवघ्या दोन वर्षापूर्वी अस्तित्वात आलेले तहसीलदार कार्यालय सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून येथे अधिकाऱयांच्या वरदहस्ताने वरकमाईला उधाण आल्याची चर्चा आहे. यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले निपाणी तालुका निर्मितीचे स्वप्न अखेर मार्च 2018 मध्ये पूर्ण झाले. त्यामुळे नागरिकांच्या चिकोडीच्या फेऱया वाचल्या. तसेच वेळ व पैशाची बचतही झाली. तालुका निर्मितीनंतर येथे आवश्यक तालुका पातळीवरील कामकाज टप्प्याटप्प्याने सुरू झाले. सध्या येथे जन्म-मृत्यू नोंद, विविध प्रकारचे दाखले, तहसील रहिवासी, डोमिसाईल प्रमाणपत्रे, अपंग, वृद्ध, विधवा, आदी विविध प्रकारच्या पेन्शन, सीमावासीय दाखले याबरोबरच रेशनकार्ड तसेच निवडणूकविषयक कामकाज पाहिले जात आहे. याशिवाय जमिनी संदर्भातील दावे येथेच निकाली काढले जात आहेत. रेकॉर्ड ऑफिसही कार्यरत झाले आहे.
वशिल्याविना शासकीय काम करताना अडचणी
असे असले तरी गेल्या काही महिन्यांपासून येथे एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. मध्यंतरी नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर येथे एजंटांना प्रवेश नसल्याचे फलक खुद्द तहसीलदार कार्यालयानेच लावले होते. मात्र एजंटशिवाय काम होत नाही अशी स्थिती येथे दिसून येत आहे. वरकमाईसाठी अधिकाऱयांपासून कर्मचारी तसेच एजंटपर्यंत साखळी कार्यरत असल्याची चर्चा आहे. कोणत्याही वशिल्याविना शासकीय काम करताना नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. याबाबत आणि तक्रारी होऊनही म्हणावे तसे लक्ष देण्यात आलेले नाही.
तीन वर्षांपूर्वी सैन्यदलात भरतीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांकडून निपाणीतील रहिवासी दाखवून बनावट कागदपत्रे बनवल्याची घटना उघडकीस आली होती. यावेळी संबंधित उमेदवारांकडून तहसील कार्यालयातील कर्मचाऱयांनी मोठय़ा प्रमाणात रक्कम उकळून सदर कागदपत्रे दिल्याची चर्चा झाली होती. याची पोलिसांमार्फत चौकशी झाली. मात्र त्याचे पुढे काय झाले? हे अद्यापही माहित नाही. मात्र त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या हस्तेच कागदपत्रे स्वीकारावीत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काही दिवस त्याची अंमलबजावणी झाली. मात्र त्यानंतर पुन्हा एजंटांचा वावर वाढला.
मोठय़ा कामांसाठी मोठय़ा रकमेची मागणी
सध्या येथे छोटय़ा कामांसाठी चिरीमिरी घेण्याबरोबरच मोठय़ा कामांसाठी मोठय़ा रकमेची मागणी होत असल्याचा आरोप होत आहे. जमीन वारसा कामासाठी अधिक लूट होत असल्याचे बोलले जात आहे. एक दीड महिन्यांपूर्वी येथील राष्ट्रीय महामार्गानजीक मुरूम उपसा होत होता. याची माहिती मिळताच घटनास्थळी गेल्यानंतर तात्काळ कारवाई करण्याऐवजी आर्थिक तडजोड करण्यात आली आली. अशा अनेक प्रकरणांमध्ये ढपला मारला जात असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. या प्रकारची गांभीर्याने नोंद घेऊन वरि÷ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी संबंधितांवर कठोर कारवाईसाठी पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









