वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात रविवारी हल्लेखोरांनी लग्नाच्या मांडवातून 24 वषीय हिंदू महिलेचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली. सिंध प्रांतातील हाला शहरात पोलिसांच्या समोरच हा प्रकार झाला. हाला हे शहर कराचीपासून 215 किलोमीटर अंतरावर आहे. अपहरणानंतर सदर महिलेचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले व मुस्लीम तरुणासोबत विवाह लावून देण्यात आला. हाला शहरातील एका हिंदू तरुणाबरोबर त्या महिलेचे लग्न होणार होते. विवाहमंडपात विवाह विधी सुरू असताना, अज्ञात हल्लेखोर तिथे आले व त्यांनी भारतीचे अपहरण केले. धर्मांतर केल्याच्या प्रमाणपत्रावर भारतीचे नवीन नाव ‘बुशरा’ आहे. भारतीच्या राष्ट्रीय ओळखपत्रामध्ये हाला शहराचा कायमस्वरुपी पत्ता देण्यात आला आहे. सध्या ती कराचीच्या गुलशन इक्बाल भागामध्ये वास्तव्याला आहे.








