जयपूरमध्ये काँग्रेसची आक्रोश सभा : आर्थिक संकटाचा मुद्दा उपस्थित
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानची राजधानी जयपूर येथे आयोजित काँग्रेसच्या आक्राश रॅलीत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकेचा भडिमार केला आहे. संपुआच्या काळात देशाचा विकासदर 9 टक्के होता. तर मोदी सरकार नव्या पद्धतीने जीडीपी मोजत असूनही विकासदर 5 टक्के आहे. 21 व्या शतकातील भारत स्वतःचे भांडवल वाया घालवत असल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.
संपुआच्या काळात आमचे सरकार गरिबांना पैसे देत असल्याने अर्थव्यवस्था चालत होती. गरिबांच्या खिश्यात पैसा गेल्यावरच अर्थव्यवस्थेला चालना मिळते. पण मोदी सरकारने गरिबांचा पैसा काढून घेत तो उद्योगपतींना पुरविल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.
मोदी सरकारने संपुआच्या काळातील मनरेगा, अन्नसुरक्षा इत्यादी योजनांना निधीच पुरविला नाही. गरिबांकडील पैसा जाताच मालाची खरेदी थंडावल्याने देशात 45 वर्षांच्या काळातील उच्चांकी बेरोजगारी निर्माण झाली आहे. एकजूटपणे वाटचाल करणाऱया भारताची प्रतिमा मोदींनी नष्ट केली आहे. जगभरात भारताला आज ‘रेप कॅपिटल’ म्हटले जाते. पंतप्रधान यासंबंधी बोलणार नाहीत आणि तरुणाईने प्रश्न विचारल्यास त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या जात असल्याची टीका त्यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांना सामोरे जा
हिंदुस्थानच्या कुठल्याही विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याचे आव्हान पंतप्रधानांना देत आहे. पण पंतप्रधान हे करू शकत नाहीत, केवळ खोटी आश्वासने देऊ शकतात. तरुणाई या देशासाठी करू इच्छित असलेले कार्य मोदी सरकार प्रत्यक्षात साकार होऊ देत नसल्याचा आरोप काँग्रेस नेत्याने केला आहे.
रोजगार गमावला
मोदींनी दोन कोटी जणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, पण मागील वर्षी एक कोटी तरुण-तरुणींनी रोजगार गमावला आहे. देशासमोरील सर्वात मोठय़ा समस्येवर पंतप्रधान एक शब्दही उच्चारत नसल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.









