एका जागेसाठी 17 फेब्रुवारी रोजी मतदान : आर. शंकरही शर्यतीत
प्रतिनिधी/ बेंगळूर
काँग्रेस नेते रिझवान अर्शद यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक घोषित केली आहे. 17 फेब्रुवारी रोजी ही पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि आर. शंकर यांच्यात चढाओढ सुरू झाली आहे.
30 जानेवारी रोजी अधिसूचना जारी होणार आहे. 6 फेब्रुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. पोटनिवडणूक जाहीर होताच उमेदवारीसाठी भाजपमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. त्यामुळे येडियुराप्पांची डोकेदुखी वाढली आहे. उपमुख्यमंत्रिपद भूषवत असलेल्या लक्ष्मण सवदी यांना महिनाभरात विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य बनणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनाच या जागेसाठी तिकीट द्यावे, अशी सूचना भाजश्रेष्ठींनी दिली आहे.
काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेल्या आर. शंकर यांना विधानसभा पोटनिवडणुकीत तिकीट देण्यात आले नव्हते. त्यांना विधानपरिषदेवर निवडून आणण्याची ग्वाही मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिली होती. याच वेळी पोटनिवडणुकीत पराभूत झालेल्या एम. टी. बी. नागराज आणि एच. विश्वनाथ यांनी आपल्याला विधानपरिषदेवर निवडून आणण्यात यावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या एका जागेसाठी चौघेजण शर्यतीत असल्याने राज्य भाजपसमोर मोठे आव्हान आहे.
तिकीटाविषयी राजकीय वर्तुळात कुतुहल
आर. रोशन बेग यांनी आमदारपदाचा राजीनामा देऊन भाजपला पाठिंबा दिला होता. पण त्यांना भाजपने प्रवेश नाकारला. दरम्यान विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी भाजपतर्फे एम. शरवण निवडणूक आखाडय़ात होते. तर काँग्रेसने रिझवान अर्शद यांना तिकीट दिले. अर्शद विधानसभेवर निवडून आल्याने त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता या पदासाठी काँग्रेस कोणाला तिकीट देईल, याविषयी कुतुहल निर्माण झाले आहे.









