वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमध्ये कोरोना विषाणूने 81 जणांचा मृत्यू झाला आहे. वुहानमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेऊन परतलेल्या राजस्थानच्या एका विद्यार्थ्याला कोरोना विषाणूने संक्रमित असल्याच्या संशयामुळे जयपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हैदराबादमध्ये चीनमधून परतलेल्या 4 जणांना तसेच बिहारच्या एक युवतीला वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आले आहे.
वुहानमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाने जंबो जेट सज्ज ठेवले आहे. सरकारचा निर्देश मिळताच भारतीयांना परत आणण्याची मोहीम सुरू केली जाणार आहे.
7 विमानतळांवर थर्मल स्क्रीनिंग
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार दिल्ली, मुंबई, कोलकात्यासह 7 विमानतळांवर थर्मल स्क्रीनिंग केले जात आहे. रविवारपर्यंत 139 सुमारे 29 हजार प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे.
चीनच्या 16 शहरांची नाकेबंदी
चीनमध्ये 24 तासांमध्ये कोरोना विषाणूचे 769 नवे रुग्ण समोर आले आहेत. आतापर्यंत 2744 रुग्णांची पुष्टी झाली आहे. तर 5794 जणांना या विषाणूची बाधा झाल्याचा संशय आहे. चीनने कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी वुहान शहराची पूर्ण नाकेबंदी केली आहे. 16 अन्य शहरांमध्येही सार्वजनिक वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
वुहानमध्ये 700 भारतीय
वुहान शहरात सुमारे 700 भारतीय विद्यार्थी शिकत आहेत. नववर्षाच्या सुटीनिमित्त यातील बहुतांश जण भारतात आले होते. तर 250 विद्यार्थी वुहानमध्येच अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनी चिंता व्यक्त केली आहे.









