विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा
प्रतिनिधी/ बेळगाव
विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून चिक्कमंगळूर जिल्हा सत्र न्यायालयाने गेल्या शनिवारी दोघा जणांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. या दोन कैद्यांना हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले आहे.
प्रदीप (वय 32), संतोष (वय 26) अशी त्यांची नावे आहेत. चिक्कमंगळूर जिल्हा सत्र न्यायाधीश उमेश अडीग यांनी गेल्या शनिवारी या दोघा जणांना विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा ठोठावली आहे. कर्नाटकातील कोणत्याही न्यायालयात गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांना अतिसुरक्षित अशा हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात येते. सध्या या कारागृहात फाशीची शिक्षा झालेले 29 कैदी आहेत. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. आणखी दोघा जणांना बेळगावात हलविण्यात आल्यानंतर ही संख्या 31 वर पोहोचली आहे.
कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्याशी संपर्क साधला असता दोन दिवसापूर्वीच संतोष व प्रदीप यांना बेळगावात आणल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना कारागृहातील अंधेरी विभागात स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे. या शिक्षेला संतोष व प्रदीप उच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.
16 फेब्रुवारी 2016 रोजी एका 18 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार करून नंतर गळा दाबून तिचा खून करण्यात आला होता. ती बी.कॉमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी होती. खुनानंतर एका पडक्या विहिरीत तिचा मृतदेह टाकून देण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने दोघा जणांना फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांना हिंडलगा कारागृहात हलविण्यात आले आहे.








