एक हजार विद्यार्थ्यांचा सहभाग, भारत माता की जय, वंदे मातरंमने दुमदुमला सातारा
प्रतिनिधी/ सातारा
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातून 300 फुटी भारतीय तिरंगा ध्वजाची रॅली काढली होती. या रॅलीत साताऱयालगतच्या कॉलेजचे एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. रॅलीतील विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी सातारा दुमदुमून सोडला. रॅली पाहण्यासाठी सातारकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. रॅलीचा समारोप राजवाडा येथील गांधी मैदानावर झाला.
विद्यार्थी परिषदेच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 300 फुट तिरंगा रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये सावकार कॉलेज, यशोदा कॉलेजचे सुमारे एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. सकाळी रॅलीला साताऱयात पोवई नाका येथून प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांच्यासमवेत भाजपाचे शहराध्यक्ष विकास गोसावी, अमित कुलकर्णी, भाजपाचे नगरसेवक धनंजय जांभळे, बांधकाम सभापती मिलिंद काकडे, प्रवीण शहाणे, विठ्ठल बलशेठवार, प्रा. सरिता बलशेठवार यांच्यासह कार्यकर्तेही सहभागी झाले होते. ही रॅली पुढे शाहू चौक, देवी चौक, मोती चौक मार्गे गांधी मैदानावर पोहचली. तेथे रॅलीचे सभेत रुपांतर होवून समारोप करण्यात आला. समारोपाच्या भाषणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री नागसेन पुंडगे म्हणाले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने 300 फुट तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभर ज्ञानशक्ती एकता या त्रिसुत्रीला घेवून वेगवेगळे उपक्रम राबवत असते. त्यातलाच भाग म्हणजे आजची तिरंगा पदयात्रा सातारा शहरात काढली आहे.
अमोद कुलकर्णी म्हणाले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेली 70 वर्ष विद्यार्थ्यांसाठी कार्य करत आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आणि जे सध्या जे देशविरोधात कार्यक्रम होत आहेत. देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यासाठीच तिरंगा रॅली होती, असे त्यांनी सांगितले









