दोन गटातील वादाचे पडसाद, घटनेनंतर परिसरात तणाव
प्रतिनिधी/ कराड
ओगलेवाडी (ता. कराड) येथे 22 वर्षीय युवकास धारदार शस्त्राने भोसकल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. भररस्त्यात झालेल्या हल्ल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. दोन गटात एकमेकाला खुन्नस देण्यावरून झालेल्या वादावादीतून युवकास भोसकले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. नरेंद्र कदम (रा. एमएसईबी रोड, ओगलेवाडी, ता. कराड) असे भोसकलेल्या युवकाचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ओगलेवाडी येथे युवकांच्या दोन गटात किरकोळ कारणावरून राडा झाला. दोन गटातील वाद तात्पुरता मिटवण्यात आला होता. शनिवारी सायंकाळी नरेंद्र कदम रस्त्यावर मित्रांसमवेत उभा असताना काही युवक हातात शस्त्र घेऊन तेथे आले. त्यांनी कदम याच्यावर हल्ला चढवला. यातील एकाने नरेंद्रला धारदार चाकूने भोसकले. अचानक झालल्या हल्ल्यामुळे नरेंद्र रक्ताच्या थारोळय़ात कोसळला. त्यानंतर हल्लेखोर युवक तेथून पसार झाले. नरेंद्रच्या मित्रांसह नागरिकांनी त्याला कराडला रुग्णालयात हलवले. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात नरेंद्रला हलवण्यात आले होते. रात्री रुग्णालयाच्या आवारात नरेंद्रच्या समर्थक मित्रांनी प्रचंड गर्दी केली होती. घटनास्थळावरही पोलीस बंदोबस्त वाढवला होता. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. हल्लेखोरांना पकडण्यासाठी त्यांनी पोलिसांना रवाना केले. युवकांच्यात एकमेकाला खुन्नस देण्यावरून मारामारी झाली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र याचे नेमके कारण काय? याचा शोध सुरू आहे.









