वृत्तससंस्था/ गोंडोमेर
पोर्तुगालमध्ये सुरू असलेल्या टोकियो ऑलिंपिक पात्रता फेरीच्या टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या पुरूष आणि महिला संघांना हार पत्करावी लागल्याने त्यांचे ऑलिंपिक स्पर्धेत प्रवेश करण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे.
अलीकडे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरूष आणि महिला टे.टे. संघांनी सुवर्णपदके मिळविली होती तर आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरूष टे.टे. संघाने कास्यपदक घेतले होते. 2018 च्या विश्व टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय पुरूष संघाने पहिल्या 15 संघांमध्ये स्थान मिळविले होते. पोर्तुगालमधील ही स्पर्धा टोकियो ऑलिंपिक पात्रतेची होती. दरम्यान या स्पर्धेत भारतीय महिला संघाला पाचव्या मानांकित रूमानियाकडून हार पत्करावी लागली. तसेच भारताच्या पुरूष टे.टे. संघाचे आव्हान स्लोव्हेनियाने संपुष्टात आणले.
महिला विभागात झालेल्या भारत आणि रूमानिया यांच्यातील लढतीत भारताच्या मनिका बात्राने एकमेव विजय नोंदविला पण रूमानियाने भारताचे आव्हान 3-2 असे संपुष्टात आणले. आता या स्पर्धेत भारतीय महिला टे.टे. संघाची उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱया टप्प्यात लढत फ्रान्सबरोबर होणार आहे. तसेच भारतीय पुरूषाची पुढील लढत झेक प्रजासत्ताकशी होईल.









