वार्ताहर / बांदा:
पाचवा बांदा लोकोत्सव येत्या 7 व 8 फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे. या महोत्सवात यंदा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. यंदाच्या पाचव्या लोकोत्सवाच्या अध्यक्षस्थानी बांद्यातील युवा कार्यकर्ते मकरंद तोरसकर तर उपाध्यक्ष म्हणून सिध्देश महाजन यांची निवड करण्यात आल्याचे बांदा लोकोत्सवाचे संयोजक अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
यावेळी जि. प. सदस्या श्वेता कोरगावकर, सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती शीतल राऊळ, सरपंच अक्रम खान, उपसरपंच हर्षद कामत, यतीन धामापूरकर, लोकोत्सव समितीचे माजी अध्यक्ष भाऊ वळंजू, लोकोत्सव समिती नूतन अध्यक्ष मकरंद तोरसकर, उपाध्यक्ष सिद्धेश महाजन, प्रसाद वाळके, राजा सावंत, माजी सरपंच मंदार कल्याणकर, बाळा आकेरकर, आबा धारगळकर, प्रवीण नाटेकर, उमांगी मयेकर, भाजप शहर अध्यक्ष केदार कणबर्गी, गुंडू साळगावकर, अण्णा पाटकर, समीर कल्याणकर व कार्याध्यक्ष सुधीर शिरसाट उपस्थित होते.
शहराच्या सास्पृंतिक व ऐतिहासिक वारसा सांगणाऱया प्रत्येक गोष्टीला या महोत्सवात प्रतिनिधीत्व दिले जाणार आहे. सांस्कृतिक चळवळीतील बांद्याचे खास आकर्षण असणाऱया स्टॅच्यूला सेल्फी स्टॅच्यूसारख्या आधुनिक रुपात सर्वांसमोर आणले जाणार आहे. तर वाजपेयी उद्यानाजवळ असलेल्या ऐतिहासिक डच वखारीवर विद्युत रोषणाई केली जाणार आहे. महिलांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वाळू शिल्पही साकारण्यात येणार आहेत. लोकोत्सवाला 6 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजता पतंग महोत्सवाने येथील अटलबिहारी वाजपेयी उद्यानातून प्रारंभ होणार आहे. तर लोकोत्सवाच्या रंगारंग कार्यक्रमाला 7 रोजी सायंकाळी शोभायात्रेने होणार आहे, असे काळसेकर यांनी सांगितले.









