युवा वैज्ञानिक तयार होण्यासाठी प्रयत्न : लॅब निर्मितीसाठी अनुदान :
वार्ताहर/ हुक्केरी
प्राथमिक स्तरातच विज्ञानाची माहिती विद्यार्थीवर्गास मिळावी म्हणून केंद्र शासनाच्या अटल टिंकरिंग या योजनेंतर्गत हुक्केरी तालुक्यातील 10 शाळा निवडल्या आहेत. यामध्ये 2 सरकारी, 4 खाजगी अनुदानीत, 2 खाजगी विनाअनुदानीत तर 2 समाजकल्याण खात्याच्या शाळांना समावेश आहे.
सन 2020-21 या सालातील शैक्षणिक वर्षापासून या शाळांमध्ये युवा वैज्ञानिक तयार करण्याचे काम चालणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन व वैज्ञानिक वृत्ती वाढावी हा यामागचा उद्देश आहे.
चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ात एकूण 8 शैक्षणिक तालुके असून त्यात 48 अटल टिंकरिंग शाळांमध्ये या योजनेला मंजुरी मिळाली आहे. या योजनेतून लॅब बांधण्यासाठी 12 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. यात 10 लाख रुपये प्रयोगाला लागणाऱया वस्तू खरेदीसाठी तसेच 5 वर्षापर्यंत 2 लाख रुपये अनुदान मिळणार आहे.
या अटल टिंकरिंग लॅब योजनेंतर्गत बस्सापूर सरकारी शाळा, खानापूर एसडीवीएच सरकारी प्रौढशाळा, संकेश्वर अक्कमहादेवी कन्या शाळा, एस. डी. हायस्कूल, निडसोसी एस. जे. डी. हायस्कूल-यादगुड, एसएलबीएस संयुक्त पीयु कॉलेज, हुक्केरी स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळा, कित्तूर राणी चन्नम्मा वसती शाळा, यमकनमर्डी विद्यावर्धक संघाची प्रौढ शाळा, होसूर मोरारजी देसाई वसती शाळा यांची निवड झाली आहे. या योजनेत नवनवीन प्रयोग करणे, स्मार्ट क्लास बनविणे, सर्व वर्गात प्रकल्प बसविणे, सकाळी व दुपारी व्हिडीओद्वारे अभ्यास करणे आदींचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या निती आयोग प्रायोजित अटल इन्व्हेंन्शन मिशन अंतर्गत 20 लाख रुपये खर्चाच्या अटल टिंकरिंग लॅबमध्ये विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण करून युवा विज्ञानी तयार करण्याचा उद्देश आहे. ग्रामीण भागात अटल लॅबमुळे शिकण्याची इच्छाशक्ती वाढणार आहे. ग्रामीण भागातील या सुविधेमुळे शहरातील मुलांबरोबरच ग्रामीण मुलांनाही आधुनिक माहिती मिळण्यास सोपे ठरणार आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी मोहन दंडिन यांनी दिली. निवड करण्यात आलेल्या या शाळांना पूरक म्हणून येथील शिक्षकवर्गालाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे क्षेत्र समन्वयाधिकारी एस. डी. नाईक यांनी सांगितले.









