ऑनलाईन टीम/ऑकलंड
भारताने पाच सामन्याच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 6 विकेट्सनी पराभव करत विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या एकदिवसीय मालिका विजयानंतर भारतीय संघाने आपली विजयी घौडदोड कायम ठेवली आहे. न्यूझीलंडने दिलेले 204 धावांचे आव्हान भारतीय संघाने 6 विकेट आणि 1 षटक राखत लिलया पूर्ण केले.
प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंड संघाने भारतासमोर 204 धावांचे आव्हान ठेवले. कॉलीन मुनरोने 59 धावा तर मार्टीन गप्टीलने 30 धावा करत संघास दमदार सुरूवात करून दिली. मात्र भारतीय गोलंदाजांनी आपल्या आक्रमक गोलंदाजीने न्यूझीलंड संघास चांगलीच दमछाक भरवली. शिवम दुबेच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने गप्टीलला झेल बाद केले. यानंतर मात्र न्यूझीलंडच्या धावगती चांगलीच मंदावली. यापाठोपाठच भारतीय गोलंदाजानी न्यूझीलंड संघास एकापोठापाठ एक धक्के देत ही धावसंख्या 203 पर्यंतच नेवू दिली. बुमराह, ठाकूर, दुबे, जडेजा आणि चहलने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.
यांनतर भारतीय फलंदाज रोहित शर्माने दमदार सुरूवात केली. मात्र दुसर्याच षटकात भारताला पहिल्या धक्क्याला सामोरे जावे लागले. यानंतर मात्र राहुल आणि विराट जोडीने 99 धावांची भागीदारी करत धावसंख्येचा डोंगर उभा केला. मात्र दोघेही लागोपाठ बाद झाल्याने भारतीय संघावर दडपण आले. पण, श्रेयस अय्यरने तुफानी 58 धावांची खेळी करत भारतीय संघाला 6 विकेट आणि 1 षटक राखत विजयी मिळवून दिला.