वार्ताहर/कुंभोज
कुंभोज तालुका हातकणंगले येथे कडकनाथ कोंबडी प्रकरणात रयत अॅग्रो तसेच अन्य कडकनाथ कंपनी सांगली व इस्लामपूर येथील कंपनीत कुंभोज व परिसरातील जवळजवळ आठ ते दहा शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या कंपनीने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, कंपनीने आपले सांगली व इस्लामपूर येथील कार्यालय बंद केले असून कार्यालयातील संबंधित अधिकारी संचालक व कर्मचारी वर्गाने सध्या कडकनाथ कोंबडी प्रकल्प राबवणाऱ्या व्यावसायिकांचे फोन उचलणे बंद केले असून त्यांना फलटण येथील कंपनीशी संपर्क साधण्याची माहिती देत आहेत.
परिणामी गेल्या दोन महिन्यापूर्वी सदर कडकनाथ व्यवसायातील शेतकऱ्यांना त्यांच्या अडकलेल्या रकमेचे बोगस चेकही देण्यात आले आहेत. सदर चेक बँकेत जमा केले असता हे चेक बोगस असल्याचे बँकेने सांगितले. याबाबत सांगली व कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेक तक्रारी दाखल झाले असून सदर प्रकरणातील आरोपी यांच्यावर असणारा राजकीय वरदस्त यामुळे कारवाई करण्यास कायदा कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे.
कुंभोज परिसरातील नागरिकांनी एका युनिटसाठी 75000 पासून तीन लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट केले आहे. तसेच सदर कडकनाथ कोंबडी पालनासाठी नूतन पोल्ट्री फार्मची बांधकाम केले आहे. एका युनिटसाठी जवळजवळ दोन ते अडीच लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. यात कोंबडीचे एक अंडे 75 ते 80 रुपये व सदर कोंबडी पाचशे रुपये दराने खरेदी करणार हा करार कंपनीशी करण्यात आला होता. कमी वेळेत मिळणाऱ्या जास्त नफा त्यामुळे या व्यवसायात अनेक शेतकर्यांनी पैसे गुंतवले होते. परिणामी सदर व्यवसायाला अचानकच राजकीय वळण मिळाल्याने सदर व्यवसाय इस्लामपूर सांगली भागात उडाल्याचे चित्र समोर आले असून त्याचे पडसाद म्हणून ग्रामीण भागातही सदर कडकनाथ व्यवसायाची मालाची देवाणघेवाण करणे कंपन्यांनी बंद केले.
सध्या सदर सर्वच कंपन्यांचे कार्यालय व फोन बंद असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी सदर प्रकरणातील आरोपींच्या वर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे.