पुणे / प्रतिनिधी :
शास्त्रीय संगीत हे केवळ विशिष्ट गटासाठीच असते, हा समज आपल्या अनेक चित्रपटांच्या संगीताला मिळणाऱया लोकप्रियतेने मोडून काढला आहे. याचे कारण चित्रपट गीतांमधून वेगळय़ा पद्धतीने त्याचे झालेले सादरीकरण. जर आपल्याला तरुण पिढीत शास्त्रीय संगीत रुजवायचे असेल तर त्यात सातत्याने प्रयोग होत संगीताचे नव्या पद्धतीने सादरीकरण करणे ही आजच्या काळाची आवश्यकता आहे. याच नवनवीन प्रयोगातून शास्त्रीय संगीत अधिकाधिक समृद्ध होईल, असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिध्द शास्त्रीय गायक महेश काळे यांनी व्यक्त केले.
महेश काळे शास्त्रीय संगीत नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्नशील असतात. त्याचाच एक भाग म्हणून ’इनफ्युजन’ ही एक नवीन संकल्पना ते श्रोत्यांपुढे आणत आहेत. यानिमित्त पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या संकल्पनेचे सादरीकरण सर्व प्रथम एनसीपीए ,मुंबई व त्यानंतर गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे अनुक्रमे येत्या दि. 1 व 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
या वेळी बोलताना महेश काळे म्हणाले, मला विविध प्रकारचे संगीत आवडते, पण मी शास्त्रीय संगीताची कास कधी सोडणार नाही, कारण माझा पिंड शास्त्रीय संगीताचा आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटानंतर श्रोत्यांची एक वेगळीच लाट समोर आली. ज्यात ज्येष्ठांपेक्षा तरुण रसिकांची संख्या जास्त होती. हे मला टिकवायचे आहे. या तरुणांनी शास्त्रीय संगीतात अधिकाधिक रस घ्यावा म्हणून काय करता येईल हा विचार सुरु झाला आणि मी काही प्रयोग करू लागलो.
चित्रपटातील शास्त्रीय रागांवर आधारित प्रसिध्द गीते घेऊन त्यांची सरगम, सोपी मांडणी आणि सौंदर्य आकर्षकरीत्या मांडण्याचा प्रयत्न यामधून सुरु झाला. त्यासाठी मोठा वाद्यवृंद संगतीला आला. हा प्रयोग लोकांना फार आवडत आहे, हे लक्षात आल्यावर त्यावर अधिक विचार करून ही ‘इनफ्युजन’ संकल्पना घेऊन आता लोकांपर्यंत पोहचत आहे. जुन्या पिढीतील जाणकारांची अपेक्षापूर्ती करत असतानाच नव्या दमाच्या तरुण पिढीचे शास्त्रीय संगीताप्रती असलेले कुतूहल टिकविणे हेदेखील महत्वाचे आहे. हा कार्यक्रम नेमके याच दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा एक प्रयत्न आहे.
या कार्यक्रमाचा गाभा हा शास्त्रीय संगीताचाच असणार आहे. यासाठी वाजणारा वाद्यवृंद हा हिंदुस्तानी व पाश्चात्य वाद्यांचा असेल. मात्र, असे असले तरी त्यांचा पाया हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचाच असणार आहे. म्हणजेच नवा साज लेवून आकर्षक पद्धतीने शास्त्रीय संगीत तरुणांना भावेल अशा स्वरुपात ते मी रसिकांसमोर मांडणार आहे.
मनोरंजनाचे बोट धरत अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या गावाला जाण्याचा हा ध्यास आहे. पूर्वीचे श्रोते टिकवायचे कसे, नवीन तयार झालेले श्रोते अधिक आत कसे शिरतील व जे श्रोते नाही ते श्रोते कसे होतील याच उद्देशाने ही संकल्पना मी घेऊन येत आहे असेही काळे यांनी सांगितले.
नुकताच गेट वे ऑफ इंडिया येथे केलेल्या एका प्रयोगाविषयी सांगताना काळे म्हणाले की मुंबई मधील 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मी राग ‘देस’ मधील एक बंदिश, एक अभंग, एक चित्रपट गीत आणि ‘वंदे मातरम’ हे गीत सादर केले. एकाच रागाची ही इतकी रुपे रसिकांनाही भावली आणि नव्या पिढीच्याही समोर ही रुपे आली. अशाच पद्धतीने अभिजात शास्त्रीय संगीताचा गाभा कायम ठेवत त्यात तबला, पखावज, टाळ या पारंपरिक वाद्यांबरोबरच पाश्चात्य वाद्यांची ‘हार्मनी’ मी एकत्र घेऊन येत आहे.