म्हासुर्ली / वार्ताहर
म्हासुर्ली (ता.राधानगरी) येथे बहुजन वंचित आघाडीच्यावतीने एनआरसी, एनपीआर, सीएए कायद्यांना तसेच आर्थिक दिवाळखोरीला विरोध दर्शविण्यासाठी पुकारलेल्या बंदला म्हासर्ली ग्रामस्थ, व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेऊन विरोध दर्शविला. तसेच ग्रामपंचायतीला निवेदन ही देण्यात आले.
एनआरसी, सीएए, एनपीआर आणि आर्थिक दिवाळखोरीच्या विरोधात विशिष्ट समाजाला सदर कायद्याद्वारे लक्ष केले जात आहे. त्यामुळे यात गरीब जनतेच प्रचंड हाल आहे. अशा या जाचक कायद्याला विरोध करण्यासाठी अॅड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी आज, महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदला पाठिंबा देत म्हासुर्लीतील व्यापारी, ग्रामस्थांनी मुख्य बाजार पेठेतील सर्व व्यवहार सकाळपासून बंद ठेवले. तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पूर्ण शांततेत बंद पाळण्यात आला. बंद काळात कुठे अनुचित प्रकार घडला नाही. या बंदमधून वैद्यकिय सेवा वगळण्यात आली होती.
यावेळी व्यापारी आसोसिएनचे अध्यक्ष निवृत्ती पाटील, प्रकाश गोते, रामचंद्र चौगले, शंकर बोरकर, चंद्रकांत चौगले, युवराज कांबळे, अजित कांबळे, कृष्णात सोनार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.